नाशिक- मराठी नवीन वर्षाची सुरवात होण्यासाठी (गुढीपाडवा) अवघे चारच दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाच्या स्वागताला बाजारपेठा सज्ज झाल्या असून यावेळी सोन्या, चांदीच्या रूपाने गुढीचे रूप अगदी खुलून आले आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याला सोने खरेदीला विशेष महत्त्व असल्याने त्यासाठी सराफ व्यावसायिकांनी जय्यत तयारी केली आहे.
कायमस्वरूपी गुढीची आठवण जपून ठेवण्यासाठी हौशी ग्राहक खास चांदीची गुढी खरेदी करतात. त्याव्यतिरिक्त नवदांपत्याला जावयाला वाण देण्यासाठी, पूजेसाठी चांदीची गुढी खरेदी केली जाते. ग्राहकांच्या मागणीनुसार या गुढी बनवून दिल्या जातात. त्यात चांदीची काठी, कलश, चांदीची चेन, गाठीची माळ, रेशम वा मलमलचे वस्त्र, पाट त्याला मिनाकाम केलेली आकर्षक गुढीचा सेटच तयार करून दिला जातो.