
Nashik Crime News : मखमलाबाद शाळा महाविद्यालय परिसरात पुन्हा टवाळखोरी वाढली!
पंचवटी (जि. नाशिक) : मखमलाबाद शाळा व महाविद्यालये परिसरात पुन्हा टवाळखोरी वाढली असून, या टवाळखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शाळेत आपल्या पाल्यांना सोडण्यासाठी येणाऱ्या पालकांनी केली आहे. (goons Makhmalabad school college area increased again Nashik Crime News)
सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असून शाळा भरण्याच्या वेळांमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे दुपारच्या सत्रात परीक्षा असल्याने शाळा दुपारी भरत आहेत. मखमलाबाद येथे दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी केंद्र असल्याने शहरातील इतर शाळांमधील विद्यार्थी, विद्यार्थिनी परीक्षेसाठी मखमलाबाद येथील शाळेत येत आहेत.
त्यांना सोडण्यासाठी व घेण्यासाठी त्यांचे पालकदेखील येतात. तर या परीक्षा संपताच लागलीच शाळा भरत असतात. शाळा व महाविद्यालयाच्या आजूबाजूला बाहेरील टवाळखोरांचा वावर वाढल्याने पालकांनी याबाबतची नाराजी बोलून दाखवली.
मखमलाबाद गावातील शाळेच्या खालची वेस भागात जवळपास पंधरा ते वीस बाहेरील टवाळखोर उभे असतात. याच भागातील तालमीच्या शेजारी, मनपा शाळेजवळ आदी भागातदेखील मोठ्या प्रमाणात टवाळखोर टवाळ्या करत असतात.
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
या भागातून वाहन वेगाने चालवणे, विद्यार्थिनी , महिलांकडे बघत राहणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या टवाळखोरांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्रस्त पालकांनी केली आहे .
कडक कारवाईची गरज
शाळा भरण्याच्या सुमारास टवाळखोर युवकांचा वावर वाढल्याने एखाद्या दिवशी अनर्थ घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांचे वाहन दिसताच टवाळखोर आजूबाजूला पळून जातात, त्यानंतर पुन्हा येऊन उभे असतात.
तोंडावर मिसरूड न फुटलेले मुलेदेखील या टवाळखोरांच्या सोबत उभे असतात. पोलिसांनी याबाबत लक्ष घालून योग्य ती कडक कारवाई करण्याची गरज आहे.