NSK26H34834 : गाेरख ठाकूर
---
फावड्याच्या प्रहाराने प्रौढाचा खून
---
तत्कालीक वादातून जळके शिवारातील घटना
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ९ : तालुक्यातील जळके शिवारात ५५ वर्षीय प्रौढाच्या डोक्यात फावडा आणि दगडाने प्रहार करून सोमवारी (ता. ९) दुपारी निर्घृण खून करण्यात आला. गोरख विठ्ठल ठाकूर (वय ५५, रा. अंतुर्ली, ह.मु. पुणे) असे मृताचे नाव आहे.
नेव्हरे शिवारातील शेतात ज्ञानेश्वर राजाराम ठाकूर वास्तव्यास असतात. त्यांचे चुलत भाऊ गोरख ठाकूर गेल्या आठवड्यापासून दिवाळीनिमित्त ज्ञानेश्वर ठाकूर यांच्याकडे आले होते. शिरसोलीतील मुकुंदा पाटील व गोरख ठाकूर यांची भेट झाली. सोमवारी दुपारी ते दोघे भेटले. त्यांच्यात वाद झाला. नंतर हाणामारी झाली. मुकुंदा याने गोरख ठाकूर यांच्या डोक्यात पावड्याने जोरदार प्रहार केला. डोक्यात वर्मी घाव बसल्यामुळे गोरख ठाकूर खाली कोसळले. घटनेची माहिती मिळताच शिरसेाली ग्रामस्थ, नातेवाईक व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थरोळ्यात निपचीत पडलेल्या गोरख ठाकूर यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषीत केले. नंतर नातेवाइकांनी आक्रोश केला. एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा केला. मृत गोरख ठाकूर यांची पत्नी व मुलगा पुण्यात वास्तव्यास आहेत. पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे, निरीक्षक बबन अव्हाड व गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हा रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली. संशयिताच्या शोधार्थ पथकांना रवाना केले आहे.