SHC26B13545
वरझडी (ता. शिरपूर) : पिकांची पाहणी करताना खासदार गोवाल पाडवी व सहकारी.
---------
दुष्काळग्रस्तांना एकरी एक लाख द्या
खासदार गोवाल पाडवी यांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. २६ : नंदुरबार लोकसभा मतदार संघाचे खासदार गोवाल पाडवी यांनी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करताना २५ ऑक्टोबरला विविध गावांना भेटी देत ग्रामस्थांशी संवाद साधला. वरझडी गावातील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली.
वरझडी गावातील सुमारे ७० ते ८० टक्के ग्रामस्थ रोजगारासाठी स्थलांतरित झाल्याने अनेक घरांना कुलूप असल्याचे चित्र दिसून आले.
शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना दुष्काळाचा मोठा फटका बसला असून, रोजगाराअभावी अनेकांना गाव सोडावे लागले आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असून, शेतकरी आणि शेतमजुरांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने आर्थिक मदत देऊन दुष्काळग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी पाडवी यांनी केली.
या वेळी प्रभारी तालुका कृषी अधिकारी कैलास गोपाळ, मंडल कृषी अधिकारी शुभम शिरसाट, उपकृषी अधिकारी दीपक पाटील, सहायक कृषी अधिकारी अविनाश पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी किरण गिरवले, योगेश वारूळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. विजय तिवारी, गेंद्या पावरा, अत्तरसिंग पावरा, भरत राजपूत, मनोज पावरा, विलास पावरा, शिवाजी पावरा, जुनेद पठाण, संजय पावरा यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
-----
मृत बालकाच्या
कुटुंबाचे सांत्वन
बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या बालकाच्या कुटुंबाचीही खासदार पाडवी यांनी भेट घेतली. त्यांचे सांत्वन करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाच्या बचाव मोहिमेला अधिक सक्षम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वनविभागाला स्वतंत्र आणि सुसज्ज वाहन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.