27169
डोंगरगाव : धान्याच्या लिलावाच्या प्रारंभी संभाजीराजे पवार, वसंत पवार, रतन बोरणारे, बाळासाहेब लोखंडे आदी.
मक्याला २३०१ तर सोयाबीनला ६६०० रुपये भाव
डोंगरगाव उपबाजारात लिलावास प्रारंभ, शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीची सुविधा
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१४ : डोंगरगाव उपबाजारात मका व सोयाबीन लिलावास बुधवारी (ता.१४) प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी शेतीमालाची चांगली आवक झाली. मक्याला सरासरी २३०१, तर सोयाबीनला ६६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. या उपबाजारामुळे परिसरातील शेतकऱ्यांना जवळच शेतीमाल विक्रीची सुविधा उपलब्ध झाल्याची माहिती येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंतराव पवार यांनी दिली.
डोंगरगाव उपबाजारात हंगामातील मका, सोयाबीन व भुसार धान्याच्या लिलावाचा शुभारंभ माजी सभापती संभाजीराजे पवार, बाजार समितीचे सभापती वसंतराव पवार, उपसभापती रतन बोरनारे, माजी मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्या दिवशी मक्याला २ हजार ते दोन हजार ५००, तर सरासरी २ हजार ३०१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.सोयाबीनला ६ हजार ५०१ ते ६ हजार ७००, तर सरासरी ६ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. पहिल्याच दिवशी मक्याची ६९७, तर सोयाबीनची ९४ क्विंटल आवक झाली. डोंगरगाव उपबाजारात सोमवार ते शुक्रवार असे आठवड्यातील पाच दिवस लिलाव सुरू राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च वाचण्यास मदत होणार असून, शेतीमाल विक्रीनंतर रोख पैसे मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
शेतकऱ्यांनी मका,सोयाबीन व अन्य भुसार धान्य स्वच्छ व वाळवून बाजार समितीत विक्रीस आणावे, असे आवाहन सभापती वसंतराव पवार, उपसभापती रतन बोरनारे व सचिव के. आर. व्यापारे यांनी केले.
याप्रसंगी संचालक किसनराव धनगे, कांतिलाल साळवे, भास्कर कोंढरे, बापूसाहेब गायकवाड, अल्केश कासलीवाल, भरत समदडीया, डोंगरगाव सोसायटी अध्यक्ष दत्तात्रेय सोमासे, बाबूराव सोमासे, उत्तमआबा सोमासे,व्यापारी अंबादास नळे, सीताराम पगारे, समाधान सोमासे, जगन सोमासे, महेश सोमवंशी आदी उपस्थित होते.