वणी- रखरखत्या उन्हात घामाच्या धारांनी आदिमायेच्या भक्तीत चिंब होत, आई भगवतीच्या भेटीसाठी माहेरहून आलेल्या पदयात्रेकरूंसह सुमारे दोन लाखांवर भक्त वणी गडावर आदिमाया सप्तशृंगीच्या तेजोमय, प्रफुल्लित, आश्वासक, आनंदी मूर्तीचे दर्शन घेत भक्तिसागरात दंग झाले. दरम्यान, शुक्रवारी (ता. ११) दुपारी आदिमायेच्या कीर्तिध्वजाची ट्रस्टच्या कार्यालयात विधीवत पूजन होऊन ढफ-ढोलाच्या गजरात उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. मध्यरात्री बाराला गडाच्या शिखरावर कीर्तिध्वज फडकल्यावर त्याचे दर्शन घेत गड सोडत खानदेशवासीय मार्गस्थ झाले.