जिल्ह्यात ३०० हेक्टरवर चारा बियाण्यांची पेरणी
---
शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाच्या उपाययोजना
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २० : दुष्काळातील चाराटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाने शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून चारा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी उपलब्ध असलेल्या ‘एफपीओ’च्या सभासदांची आतापर्यंत तीन वेळा बैठक घेऊन साधारणत: ३०० हेक्टरपर्यंत चाऱ्याची पेरणी करण्यात येईल. वेळ पडल्यास अधिक पेरणीचे नियोजन आहे.
जिल्ह्यातील १३ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. या ठिकाणी साधारणत: ३१ जानेवारी २०२७ पर्यंत पुरेल इतका चारा शिल्लक असल्याने फेब्रुवारीपासून चाराटंचाई भासू शकते. जिल्ह्यात विविध प्रकारची १८ लाख जनावरे आहेत. त्यांना प्रत्येक दिवशी जनावरांना दिवसाला चार हजार टन ओला किंवा सुका चारा लागतो. खरीप हंगामात झालेल्या पेरणीच्या आधारे चाऱ्याची उपलब्धता निश्चित करून त्यानुसार दुष्काळाचे नियोजन केले जाते. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने चाऱ्याचे नियोजन केले असून, जिल्ह्यातील जनावरांना ३१ जानेवारीपर्यंत पुरेल इतका चारा सध्या शिल्लक आहे. त्यानंतर चाऱ्याची टंचाई भासू शकते म्हणून आताच चाऱ्याचे मोफत बियाणे वाटप केले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे, त्यांना हे बियाणे दिले जाईल. त्यासाठी तीन कोटींची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नोंदविण्यात आली आहे.
तसेच, शेतकरी उत्पादक कंपन्यांना मोफत बियाणे देण्यात येणार असून, त्यांना चारा विकण्यास परवानगी असेल. ज्यामुळे शेतकऱ्यांना चारा अगदी सहज उपलब्ध होईल. यादृष्टीने पशुसंवर्धन विभागाने नाशिक, दिंडोरी, निफाड तालुक्यातील ‘एफपीओ’ची बैठक घेतली. त्यांना या उपक्रमाविषयी माहिती देण्यात आली. उसापेक्षा ओल्या चाऱ्याचे दर अधिक असल्याने शेतकऱ्यांना एकरी ३० ते ४० हजारांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी फक्त चारा बियाण्यांची पेरणी करून त्याची वाढ करून विक्री करावी. या माध्यमातून त्यांना उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण करून देण्यात आला आहे. वेळ पडल्यास शासन स्वत: चाऱ्याची खरेदी करणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, याबाबत अद्याप शासन आदेश नसल्याने त्याविषयी शेतकरी उत्पादक कंपन्यांना कुठलेही आश्वासन देण्यात आलेले नाही. वेळ पडल्यास अधिक क्षेत्रावर पेरणी केली जाऊ शकते.
‘सीईओ’ पवार स्वत: करणार पेरणी
दुष्काळावर मात करण्यासाठी चाऱ्याची पेरणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार हे स्वत: एका गावात जाऊन पेरणी करणार आहेत. पशुसंवर्धन विभागामार्फत त्याचे नियोजन सुरू असून, लवकरच पेरणीला सुरुवात होईल.
जिल्ह्यातील जनावरांना फेब्रुवारीपर्यंत पुरेल इतका चारा सध्या आहे. त्यानंतर चाराटंचाई भासल्यास आताच पेरणी करण्याचे नियोजन आहे. शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकऱ्यांना त्यासाठी मोफत बियाणे देण्यात येईल.
- संजय शिंदे, सहायक पशुसंवर्धन अधिकारी, नाशिक