जळगावात उद्या देशभरातील गुर्जर अधिवक्त्यांचा मेळावा ‘जीए ५००’च्या आठव्या राष्ट्रीय लॉयर्स कॉन्फरन्सचे आयोजन

जळगावात उद्या देशभरातील गुर्जर अधिवक्त्यांचा मेळावा
‘जीए ५००’च्या आठव्या राष्ट्रीय लॉयर्स कॉन्फरन्सचे आयोजन
Published on: 
जळगावात आज देशभरातील गुर्जर अधिवक्त्यांचा मेळावा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २४ : देशभरातील गुर्जर समाजातील अधिवक्त्यांना एका व्यासपीठावर आणून कायदे क्षेत्रातील व्यावसायिक सहकार्य, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रनिर्मितीचा संदेश देण्यासाठी ‘जीए ५०० गुजर ॲडव्होकेट’ यांच्या वतीने आठव्या राष्ट्रीय लॉयर्स कॉन्फरन्सचे आयोजन उद्या (ता. २५) जळगावात करण्यात आले आहे. देशाच्या विविध राज्यांतील गुर्जर अधिवक्ते या परिषदेत सहभागी होणार असून, कायदे क्षेत्रातील अनुभवांची देवाणघेवाण आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसंदर्भात विचारमंथन केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वराज्य आणि सुशासनाच्या परंपरेचा गौरव करणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमीत होणारी ही परिषद हॉटेल कमल पॅराडाईज, गट क्रमांक १२९, सरस्वती नगर, कालिका माता मंदिराजवळ, महामार्ग क्रमांक सहा, भुसावळ रोड येथे होणार आहे. सकाळी दहाला मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. परिषदेचे आयोजन ‘जीए ५००महाराष्ट्र टिम’च्या माध्यमातून करण्यात आले आहे. चौकट मान्यवरांची उपस्थिती परिषदेला राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राजस्थान उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व्ही. एस. सिराधना, विधान परिषद सदस्य नंदकिशोर महाजन, माजी राज्य माहिती आयुक्त व्ही. डी. पाटील आणि दिल्ली पोलिसांचे माजी उपायुक्त जी. एस. आवाना यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय अधिवक्ता भारत भूषण गुर्जर, शंताराम महाजन, विनोद पाटील, भगवान पाटील, जी. एम. पाटील, एस. यू. चौधरी, यशवंत महाजन, प्रशांत चौधरी, ललितकुमार महाजन, राजेंद्र गुर्जर आणि योगेश महाजन यांच्यासह कायदे क्षेत्रातील विविध मान्यवर सहभागी होणार आहेत.
Marathi News Esakal
www.esakal.com