जिल्ह्याच्या सीमेवर
१५ लाखांचा गुटखा जप्त
जळगाव, ता. ९ : अन्न औषध प्रशासन व मुक्ताईनगर पोलिसांच्या पथकाने जिल्ह्याच्या सीमेवर तब्बल १५ लाख ८८ हजार ५०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त केला. या कारवाईत एका बोलेरो पीकअप वाहनासह एकूण १९ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
मंगळवारी (ता.६) दुपारी पोलिस निरीक्षक आशिष आडसूळ यांना मुक्ताईनगर शहरातून पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा बोलेरो पीकअप(क्रमांक एचआर ८४-१०७३) या मालवाहू वाहनामधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याचा संशय आला. या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक तुषार पाटील, पोलिस शिपाई रवींद्र धनगर व प्रशांत चौधरी यांच्या पथकाने बोदवड चौफुलीजवळील महिंद्रा हॉटेलसमोर सदर वाहन थांबवले. वाहनाच्या चालकाने विचारपूस करताना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी वाहन मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात आणले. याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी योगराज सूर्यवंशी यांना माहिती देण्यात आली. सूर्यवंशी हे दोन शासकीय पंचांसह (रवींद्र तायडे व फकीरा बोरे) पोलिस ठाण्यात हजर झाले. सर्वांच्या उपस्थितीत वाहनाची पाहणी केली असता, त्यात एचडीपीई प्लास्टिकच्या एकूण ३६ गोण्यांमध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थ आढळून आले.