Nashik Crime News : साडेचार लाखांचा गुटखा सटाणा पोलीसांकडून जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gutkha stock seized by Satana Police under the leadership of Assistant Police Inspector Kiran Patil.

Nashik Crime News : साडेचार लाखांचा गुटखा सटाणा पोलीसांकडून जप्त

सटाणा (जि. नाशिक) : सटाणा पोलीस ठाण्याचे प्रभारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली सटाणा पोलीसांनी तालुक्यातील अवैध व्यवसायिकांच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली असून, या कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे.

सटाणा पोलीसांच्या पथकाने लखमापुर (ता. बागलाण) येथे तब्बल चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचा गुटख्याचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली आहे. (Gutkha worth four half lakhs seized by Satana police Nashik Crime News)

लखमापुर येथे एका पिकअप वाहनात मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती श्री. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना समजली होती. त्यानुसार त्यांनी तातडीने लखमापुर गाठत संशयीत वाहनाची कसुन तपासणी केली असता, त्यात जवळपास एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचा गुटखा आढळून आला.

पोलीसांनी वाहन चालक सचिन संतोष जाधव याला वाहनासह तत्काळ अटक केली. या कारवाईत पोलीस हवालदार हेमंत कदम, दीपक सोनवणे, पोलीस नाईक अजय महाजन, पोलीस शिपाई विक्रम वडजे, विलास मोरे, संतोष भगरे, गोपनीय शाखेचे अशोक चौरे, दत्ता आहेर, सागर बनुसकर यांचा सहभाग होता. या कारवाईचे जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी कौतुक केले आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

दरम्यान, सटाणा पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदाचा कार्यभार घेताच श्री. पाटील यांनी गेल्या दोन महिन्यांत अवैध दारू विक्री, दारूची तस्करी, गुटखा, अवैध हातभट्टी, गोवंश वाहतूक आदी अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे.

सटाणा पोलीस ठाण्याचा वाढता विस्तार बघता येथे दुय्यम अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या कमी असूनही श्री. पाटील यांनी उपलब्ध यंत्रणेच्या सहकार्याने अवैध धंद्यांच्या विरोधात ठोस कारवाई करून यश मिळवले आहे.

तालुक्याचा विस्तार आणि पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्र लक्षात घेता पाटील यांच्या सोबतीला इतर चार पोलीस उपनिरीक्षक व सुमारे दहा पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्यास तालुक्यातून अवैध धंदे हद्दपार होऊ शकतील, असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.