esakal | हरितालिका उत्सव आरोग्याचा 
sakal

बोलून बातमी शोधा

haritalika pujan and health nashik marathi article

श्रावण मास संपला, की भाद्रपदाला सुरुवात होते आणि पावसाळ्याच्या दुसऱ्या पर्वाची नांदी होते .श्रावण तसा धार्मिक महिना परंतु धर्मशास्त्राने सर्वांगीण आरोग्यासाठी उत्तम सांगड ऋतूचा विचार करून आहार-विहार आणि ऋतू परत्वे मिळणाऱ्या विविध वनस्पती भाज्या यांचा वापर प्रामुख्याने केलेला दिसतो.  -वैद्य विक्रांत जाधव 

हरितालिका उत्सव आरोग्याचा 

sakal_logo
By
वैद्य विक्रांत जाधव

श्रावण मास संपला, की भाद्रपदाला सुरुवात होते आणि पावसाळ्याच्या दुसऱ्या पर्वाची नांदी होते .श्रावण तसा धार्मिक महिना परंतु धर्मशास्त्राने सर्वांगीण आरोग्यासाठी उत्तम सांगड ऋतूचा विचार करून आहार-विहार आणि ऋतू परत्वे मिळणाऱ्या विविध वनस्पती भाज्या यांचा वापर प्रामुख्याने केलेला दिसतो.

पाऊस खूप पडल्यानंतर येणारे हे दिवस. जठराग्नी श्रावणाच्या उपवासाने वाढायला सुरुवात होते , तर पचनशक्ती ही वाढू लागते. भाद्रपदामध्ये हळूहळू आहार वाढवून निसर्गात येणाऱ्या विशेष फळ भाज्यांचा वापर आहारात करण्याचा सल्ला दिला आहे. ज्यायोगे शारीरिक शक्ती बळ वाढेल. हरतालका तसा स्त्रियांसाठी उपवासाचा दिवस. ज्याला धार्मिक कथेची जोड देऊन स्त्रीला व परिवाराला बळ देण्यासाठी शास्त्राने योजना केली आहे. या व्रताच्या निमित्ताने स्त्रियांचे सौंदर्य वृद्धी साठी विशेष प्रयत्न केलेले दिसतात. त्वचेवर दिसणाऱ्या वाताच्या प्रकोपाची लक्षणे दूर करण्यासाठी तीळ तेल व आवळकंठी चूर्ण (या काळात ताजा आवळा मिळत नाही हे ध्यानात घेतले आहे) अंगाला लावून गाईचे दूध व हळद लावण्याची प्रथा आहे. या प्रथेमुळे शरीराचे बळ वाढते. त्याचबरोबर त्वचेतील वात कमी होवून त्वचा तेजस्वी होण्यास मदत होते. आवळकंठी त्वचेतील रुक्षता व क्लेद कमी करून शरीराला बळकटी देते. तीळ हे त्वचेला स्निग्धता देते. तसेच मास पेशींचे बळ वाढवून शरीर बळकट करते. बाह्यता असलेल्या या कृतीमुळे शरीरस्थ वात कमी होण्यास मदत होते. हरतालिकाच्या उपवासामध्ये नारळाच्या पाण्याला विशेष महत्व दिलेले दिसते. नारळ तत्काळ शक्ती देणारा स्निग्ध असून त्वचेला तेजस्वी करणारा आहे. शरीराचा अशक्तपणा तत्काळ कमी करणारा असून त्यामध्ये आल्याचा रस व लिंबाचा रस टाकल्यास अधिक फलश्रुती मिळते. यातून शास्त्राने खोबरे खायला सुरुवात करण्याचे संकेत दिले आहेत. 

हरितालिकातील भाज्या 

हरतालिकापासूनच विविध फळभाज्या तसेच पानांच्या भाज्या खाण्याची विशेष प्रथा बऱ्याच प्रांतात दिसून येते. ती आरोग्याच्या हेतूने. या विशेष भाज्या खाण्याचे निर्देश शास्त्राने दिलेले दिसतात. या भाज्यांचा काही प्रांतात नैवैद्य गौरीला देतात, तर काही हरितालिकाच्यानिमित्ताने खायला सुरुवात करताना दिसतात. पावसाळा असल्याने आरोग्यदृष्ट्या अनेक भाज्या वर्ज्य असतात. त्या सर्व रुचकर, पुष्टीकर-आरोग्यवर्धन करणाऱ्या भाज्या खाण्याची सुरुवात हरितालिकापासून होताना दिसते. गौरीच्या आशीर्वादाने ती पुढे सरावते. या भाज्यांचा विचार केल्यास लक्षात येईल की, पावसाळाच्या दुसऱ्या सत्रातील आरोग्य राखणे आणि शरीराला बळ देणे हा संकल्प दडलेला आहे. दोडके, गिलके, डांगर (काळ्या पाठीचा) दुधी, कारले, तोंडली, चवळी च्या शेंगा, माठ, फरसबी, चाकवत, भेंडी, सिमला मिरची, गवार, काकडी, हदगा व पडवळ मुखत्वे करून समाविष्ट आहे. देश-प्रांत परत्वे काही भाज्या बदलतात. पण गाभा मात्र तोच दिसतो. कोकणात सुरण, मुळा, आळू व शेवग्याची पाने (शेकटची भाजी) यांचा ही समावेश दिसतो. घरातील प्रत्येक व्यक्तीचे सर्वोतोपरी उदरभरण, शरीरस्थ धातू पुष्ठी, मनाची तृप्ती त्या स्त्रीने करण्यासाठी याची प्रथा व्रताच्या निमित्ताने शास्त्राने केलेली दिसते. 

दुधी भोपळा वाढलेला कफ, पित्त कमी करणारा, धातुवृद्धी करणारा तसेच हृदयाला बळ देणारा आहे. डांगर कृमी कमी करणारी (पावसाळ्यात शरीरामध्ये कृमीचे प्रमाण वाढताना दिसते) फळ भाजी असून फुफ्फुसासाठी उत्तम टॉनिक आहे. सध्या काळात प्रथिने वाढवण्यासाठी वेगळा अनैसर्गिक आहार घेतला जातो. डांगर हे फळ या काळातील उष्णतेमुळे कमी होणारी लघवी मोकळी करण्यास मदत करते. श्रावण घेवडा श्रावणातील खास भाजी होय. बळकटी देणारा अत्यंत पौष्टिक, धातू पुष्ठी करणारा स्निग्ध गुणाचा असून पचायला हलका आहे, रुचकर आहे. त्यामध्ये तीळ व कोकम टाकल्यास वेगळीच चव येते. पालेभाज्यामधील एक श्रेष्ठ भाजी चाकवत. गोड असून भूक वाढवणारी, पचनशक्ती सुधारणारी, पचायला हलकी, प्लीहेला यकृताला उत्तेजित करून त्यांचे कार्य सुधारणारी आहे. कर्कटश्रुंगी अथवा काकडी थंड असून मल व स्त्राव बांधणारी आहे. म्हणून या ऋतूमध्ये आले, मिरे टाकून भाजी म्हणून अथवा नुसती सेवन करायला उत्तम. पावसाळ्यात वाढणारी उष्णता कच्ची काकडी कमी करते हे ध्यानात घ्या. कारले कडक मल प्रवृत्तीला कमी करणारे असून पोटातील वायू कमी करणारे आहे. रक्त शुद्ध करून पांडू रोग कमी करणारी भाजी आहे. गिलके उष्णता कमी करून मुरूम पुटकुळ्या, तारुण्य पिटीका यावर रक्त शुद्ध करून कार्य करते. भूक वाढवते, आम्लपित्त कमी करते. दोडके पित्त नाशक, प्रतिकारक्षमता वाढवणारे आहे. पडवळ फळ भाज्यांमधील श्रेष्ठ भाजी, गोड असून रक्त विकार यकृत विकार व ह्रदयाला उत्तम. हदग्याची भाजी मधुमेहासाठी, जुनाट तापावर, थकव्यावर, हृदयरोगावरील उत्तम टॉनिक आहे. शेवगा कृमीनाशक असून, डोळ्यांसाठी उत्तम, वातनाशक, पचायला हलका आहे. भेंडी पचायला हलकी, हृदयरोगी व मधुमेहासाठी उत्तम. लाल माठ स्निग्ध गुणाची रक्त वाढवणारी, हृदय प्लीहे वर गुणकारी, गर्भाशयाला बळ देणारी आहे. गोवर, पित्त व वातनाशक, लघवी प्रमाण वाढवते व रक्तशुद्धी करते. मुळा पचायला हलका, चव आणणारा पचनशक्ती वाढवणारा. तुपासह सेवन केल्यास त्रिदोषनाशक आहे. मुळव्याधीमध्ये सुरण गुणकारी तर आळू चव आणून कृमीनाश करणारा पचनाशक्ती वाढवणारा आहे. 
 

loading image
go to top