हस्ती बँकेचा ठेवीदारांना सव्वा कोटींचा विमा
---
ठेवीदारांच्या सुरक्षिततेसाठी ३०.६८ लाखांचा हप्ता बँक भरणार
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २५ : दोंडाईचास्थित हस्ती बँकेतर्फे बँकेचे आधारस्तंभ कांतीलाल जैन यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त ठेवीदारहिताच्या ‘कै. कांतीलालजी ठेवीदार विमा योजने’चा प्रारंभ मुख्य कार्यालयात करण्यात आला. ठेवींच्या बचतीला कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेची जोड देणारा हा उपक्रम राहील.
कांतीलाल जैन यांच्या प्रतिमेचे प्रारंभी पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यांनी आयुष्यभर जपलेला सेवाभाव, समाजाप्रती बांधिलकी आणि ग्राहकहिताचा वारसा या योजनेतून पुढे नेण्यात येत असल्याचे बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले. झुरिक कोटक जनरल इन्शुरन्स कंपनी (इंडिया) यांच्या ‘ग्रुप ॲक्सिडेंट प्रोटेक्ट’ पॉलिसी अंतर्गत पात्र ठेवीदारांना मोफत समूह अपघाती मृत्यू विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पॉलिसीमध्ये एक लाख २७ हजार विमाधारकांची नोंद असून, जीएसटीसह ३० लाख ६८ हजारांची संपूर्ण विमा रक्कम हस्ती बँक भरणार आहे. त्यामुळे पात्र ठेवीदारांना या संरक्षणासाठी स्वतंत्र विमा हप्ता भरावा लागणार नाही.
या योजनेत बचत खाते, चालू खाते, मुदत ठेव आणि आवर्ती ठेवींचा पॉलिसीच्या अटींनुसार समावेश आहे. किमान पाच हजार व त्या वरील रक्कम डिपॉझिट असलेले आणि तीन ते ८० वर्षे वयोगटातील ठेवीदार योजनेच्या पात्रतेत येतात. संयुक्त खातेदारांना त्यांच्या ठेवीतील प्रमाणानुसार, तर अल्पवयीन ठेवीदारांना पॉलिसीच्या अटींनुसार संरक्षण लागू राहील. विमासंरक्षित ठेवीदाराचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाल्यास, अपघाताच्या दिवशी असलेली पात्र ठेव व त्यावरील व्याज यांच्या आधारे नामनिर्देशित व्यक्तीस अथवा पात्र दावेदारास अटींनुसार विमा लाभ मिळू शकतो. प्रतिव्यक्ती कमाल विमा संरक्षण एक कोटी २५ लाखांपर्यंत असून, संरक्षणाचा कालावधी १२ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२७ असा आहे. संकटाच्या प्रसंगी ठेवीदाराच्या कुटुंबाला आर्थिक आधार देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. ग्राहकांचा विश्वास हीच बँकेची खरी संपत्ती असून, त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी ही योजना महत्त्वाचे पाऊल असल्याचे चेअरमन कैलास जैन यांनी सांगितले. ग्राहक, सभासद आणि व्यापारी बांधवांनी योजनेची माहिती घेऊन लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
संरक्षण अपघाती मृत्यूसाठी आहे. सर्व विमाधारक मिळून एका अपघातातील अथवा घटनेतील एकूण विमा देयतेची मर्यादा एक कोटी २५ कोटी आहे. सर्व लाभ पॉलिसीतील पात्रता, अटी व अपवादांच्या अधीन राहतील.
उद्योगपती अशोक जैन, दोंडाईचा शाखा समितीचे अध्यक्ष किशोर जैन, संचालक पहलाज माखीजा, वासुदेव पाटील, पांडुरंग कांगणे, संचालिका मधुबाला जैन, मंजूषा पाटील, बँकिंग तज्ज्ञ प्रकाश कुचेरिया व शाखा समिती सदस्य प्रदीप जैन उपस्थित होते. बँकेचे ग्राहक व सभासद धरमचंद बोथरा, बी. बी. पाटील, चोईथ कुकरेजा, सुभाष जैन, किशोर कासार, पंकज चोळके, डॉ. बी. एम. जैन, दीपक बोदवाणी, अजय पाटील, सुनील चौधरी, महिंद्र चौधरी, डॉ. महिंद्र जैन, अभय पवार, योगेश पाटील, गौतम माखिजा, राजेंद्र गेलडा, जगदीश चौधरी, योगेश भावसार, पी. जी. पाटील, पंडित पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश जैन, आयटी हेड सुनील गर्गे, सि. मॅनेजर अमर छाबडिया, मुख्य शाखेचे शाखा व्यवस्थापक मनोज सोनवणे आणि कर्मचारी उपस्थित होते.