टुडे १, मेन (हतनूर धरणाचे संग्रहित छायाचित्र वापरावे)
-----
लोगो : सकाळ exclusive
---------
हतनूर पूर्ण भरले..पण धरणात ६० टक्के गाळच
उपशीर्षक
प्रत्यक्ष साठा १५२ दलघमी; फेब्रुवारीअखेर धरण पडणार कोरडे
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ९ : पूर्व जळगाव जिल्ह्यासाठी संजीवनी ठरणारे हतनूर धरण तापी नदीवरील महत्त्वाचा प्रकल्प आहे. तापी- पूर्णा नद्यांच्या प्रवाहामुळे दरवर्षी या धरणातून दीड- दोनशे टीएमसी पाणी सोडले जाते. दरवर्षी धरण १०० टक्के भरल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात केंद्रीय जल आयोगाच्या २०२४ च्या गाळ सर्वेक्षण अहवालानुसार प्रकल्पात सुमारे ६० टक्के गाळच आहे. या अहवालाचा आधार घेतला तर आजमितीस हतनूर धरण पूर्ण भरल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात त्यात ३९ टक्केच उपयुक्त पाणीसाठा असून ‘अल निनो’मुळे वाढलेल्या तापमानाच्या पार्श्र्वभूमीवर यंदा फेब्रुवारीतच धरण कोरडे पडण्याची शक्यता आहे.
हतनूर प्रकल्प, तापी नदीवरील जळगाव जिल्ह्यातील हे पहिलेच धरण. उर्ध्व तापी प्रकल्प म्हणून या धरणाचा शासकीय भाषेत उल्लेख केला जातो. मध्य प्रदेशातील वाहत येणारी तापी आणि विदर्भातून वाहत येणाऱ्या पूर्णा नदीचा चांगदेव- मेहूण येथे संगम झाल्यानंतर पुढच्या टप्प्यात हे धरण उभारले आहे. दोन्ही नद्यांच्या मोठ्या प्रवाहांनी हे धरण प्रत्येक पावसाळ्यात बऱ्याचदा १०० टक्के भरुन ओव्हरफ्लो होते. त्यामुळे दरवर्षी धरणातून सरासरी १५० ते २०० टीएमसी पाणी नदीपात्रात सोडून द्यावे लागते.
१४-१
गाळात रुतलेला प्रकल्प
हतनूर प्रकल्पाची संकल्पित पाणीसाठ्याची क्षमता ३८८ दलघमी आहे, पैकी उपयुक्त पाणीसाठा २५५ तर मृत साठा १३३ दलघमी आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र २९ हजार चौरस किलोमीटर असून हे क्षेत्र भुसभुशीत व काळ्या मातीच्या जमिनीचा परिसर आहे. वर्षानुवर्षे तापी, पूर्णा नदीला आलेल्या पुरासोबत मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येत तो हतनूर धरणात जमा होत गेला. पाणी साठवण क्षमतेपेक्षाही गाळाचे प्रमाण जास्त झाल्याने ही या प्रकल्पाची मोठी समस्या बनली आहे.
१४-२
२०२४ च्या अहवालानुसार
धरणात ६० टक्के गाळ
केंद्रीय जल आयेगाने नोव्हेंबर २०२४ मध्ये या प्रकल्पाचे गाळ सर्वेक्षण केले. त्यानुसार त्यावेळी प्रकल्पात केवळ १५७ दलघमी उपलब्ध पाणीसाठा आढळून आला. त्यात गाळामुळे पाणीसाठ्यात दरवर्षी १.४२ टक्के घट गृहित धरण्यात आली. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत जवळपास ४.४६ टक्के घट गृहित धरली तर, यंदाही प्रकल्प पूर्ण भरल्याचा दावा केला जात असला तरी त्यात या गाळामुळे पाणीसाठ्यात येणाऱ्या घटनुसार प्रत्यक्ष साठा केवळ १५२.५५ दलघमी एवढाच असल्याचा दावा तज्ज्ञांकडून केला जातोय.
.. तर फेब्रुवारीतच प्रकल्प कोरडा
यंदा ‘अल निनो’च्या प्रभावामुळे अत्यल्प पाऊस झाला. मॉन्सूनोत्तर पावसातही १५ ऑक्टोबरपर्यंत हतनूरमध्ये पाण्याची आवक सुरू असते. यंदा ती तेवढी सुरू नाही. शिवाय, सध्याच्या ६१ टक्के गाळामुळे आणि प्रकल्पीय बाष्पीभवन १०८ दलघमी गृहित धरले तर, प्रकल्प फेब्रुवारी २०२७ मध्येच कोरडा पडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. अशा स्थितीत भुसावळ शहरासह औद्योगिक प्रकल्प, आयुध निर्माणी, रेल्वेला पाणीपुरवठ्यात मोठी अडचण येऊ शकते.
-----------
ग्राफ
हतनूर प्रकल्प.. दृष्टिक्षेपात
संकल्पित साठा : ३८८ दलघमी
उपयुक्त साठा : २५५ दलघमी
मृत साठा : १३३ दलघमी
----
२०२४ च्या गाळ सर्वेक्षण अहवालानुसार
उपलब्ध साठा : १५७.०१ दलघमी
सरासरी वार्षिक घट : १.४२ टक्के
तीन वर्षांत एकूण घट : ४.४६ टक्के
सद्य:स्थितीत साठा १५२.५५ दलघमी
(गाळ सर्वेक्षणानुसार घट गृहित धरून)
----------