धुळ्यात चौदा दिवसांत ४८१ शिबिरे
माता-बाल आरोग्यापासून कर्करोग तपासणीपर्यंत विस्तार
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ५ : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यात १७ ते ३० सप्टेंबर या चौदा दिवसांत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात ४८१ आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी दिली.
सेवा संकल्प अभियान १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान सुरू आहे. या अंतर्गत माता-बाल आरोग्याला प्राधान्य देण्यात आले आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानातून ८२ विशेष शिबिरे घेण्यात आली. यामध्ये गर्भवतींची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. रक्त, मधुमेह, रक्तदाब, एचआयव्ही आणि कावीळ तपासण्या करण्यात आल्या. रक्तक्षय आढळलेल्या मातांना उपचार देऊन पुढील सेवेसाठी संदर्भित करण्यात आले. अंगणवाडीतील सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील बालकांची कुपोषण निदानासाठी तपासणी करण्यात येत आहे. समुदाय आरोग्य अधिकारी आणि आरबीएसके पथके ही तपासणी करीत आहेत.
शिबिरांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी करण्यात आली. निदान झालेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. या काळात प्राथमिक आरोग्य केंद्रातील ४७ नवजात बालकांचे जन्म दाखले वाटप करण्यात आले असल्याचे डॉ. बोडके यांनी सांगितले.