रायसोनी महाविद्यालयात
‘स्वास्थ्य सखी’ उपक्रम
-------
महिलांच्या आरोग्याबाबत जागृती
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२५ : महिलांच्या आरोग्यविषयक समस्या व प्रतिबंधात्मक उपायांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने येथील जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या एचआर विभागाच्या वतीने ‘वुमेन्स वेलनेस अँड हेल्थ अवेअरनेस सेशन’अंतर्गत ‘वुमेन्स हेल्थ-स्वास्थ्य सखी’ या विशेष मार्गदर्शन सत्राचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
या सत्रात प्रमुख पाहुणे डॉ. भावना चौधरी यांनी महिलांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांनी महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयमुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. महिलांनी स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक राहणे, आरोग्याशी संबंधित लक्षणांकडे दुर्लक्ष न करणे व आवश्यकतेनुसार वैद्यकीयतज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे असल्याचे या मार्गदर्शनातून अधोरेखित झाले. आरोग्यविषयक योग्य माहिती, वेळेवर तपासणी व प्रतिबंधात्मक उपाय यांमुळे महिलांना आरोग्याच्या समस्यांबाबत अधिक सजग निर्णय घेता येतात, हा संदेश या सत्रातून देण्यात आला.