esakal | VIDEO: इगतपुरी पूर्व भागात जोरदार गारपीट; बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

बोलून बातमी शोधा

Heavy hail in the eastern part of Igatpuri
VIDEO : इगतपुरी पूर्व भागात जोरदार गारपीट; बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
sakal_logo
By
राम शिंदे

सर्वतीर्थ टाकेद (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद परिसरात बुधवारी (ता. २८) सायंकाळी बेमोसमी पावसाने हजेरी लावली. जोरदार वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटात झालेल्या जोरदार गारपिटीने धुमाकूळ घातला. दरम्यान, बेमोसमी पावसाने पूर्व भागातील पिंपळगाव मोरपासून खेड, अधरवड, इंदोरे, खडकेद, वासाळी, बारशिगवे, सोनोशी, मायदरा, अडसरे बु, बेलगाव, धामणी, धामणगाव, टाकेद खुर्दसह साकूर फाटा, शेनीत, निनावी, भरविर परिसरात गारपिटीसह जोरदार हजेरी लावली. यामुळे संपूर्ण टाकेद परिसरात वीजपुरवठा बंद होता.गारपिटीमुळे बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या शेतकरीवर्गात बागायतबरोबरच पावसाळ्यात मुक्या जनावरांसाठी गवत, वैरण, काडी साठविण्याचे कामकाज यासोबतच लाकूड फाटा, खत सामग्री करण्याचे कामकाज चालू आहे. अशातच संचारबंदीमुळे घरातच सुरक्षित बसलेला शेतकरी, शेतमजूर दोन वेळेच्या भ्रांतीसाठी घरीच मेहनत घेताना दिसत आहे. गहू, हरभरा काढणीनंतर पावसाळी मशागतीच्या पूर्वतयारीसाठी शेतकरी मेहनत घेताना दिसत आहे. या परिस्थितीमध्ये अवकाळीसारखे अस्मानी संकट हे शेतकऱ्यांच्या मुळावर आल्याने शेतकरीराजा दुहेरी संकटात पडला आहे. पूर्वपट्ट्यातील धरणालगत असलेल्या पिंपळगाव मोर, बेलगाव, धामणगाव, भरवीर, निनावी, कवडदरा, साकूर अडसरे या परिसरातील कायम ओलिताखाली शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकांसह जनावरांचा चारा, वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बागायत पिकांना अवकाळी गारपिटीचा तडाखा बसला आहे.