Latest Marathi News | मालेगावी मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांसह व्यावसायिकांची उडाली धांदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water accumulated on the road near Ektamata Chowk due to heavy rain.

Heav Rain : मालेगावी मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांसह व्यावसायिकांची उडाली धांदल

मालेगाव (जि. नाशिक) : शहर व तालुक्यात बुधवारी (ता. १२) दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. एक ते दीड तास झालेल्या पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणी साचले होते. रस्त्याच्या कडेला हातगाडीवर फळे, भाजीपाला व इतर साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची धावपळ उडाली. ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी व शेतमजुरांची तारांबळ उडाली. बाजरी व मका काढणीचे काम सुरु असल्याने काही ठिकाणी नुकसान झाले.

पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वच घटकांमध्ये काळजीचे वातावरण आहे. या वर्षी शहर व परिसरात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या जवळपास दुप्पट पाऊस झाला आहे. दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्याने समाधान व्यक्त केले जात होते. बुधवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला.

कॉलेज मैदान, बसस्थानक तसेच झोपडपट्टी भागात अनेक ठिकाणी पाणी साचले. पावसाच्या पाण्याने गटारी तुडूंब भरुन वाहत होत्या. शहरात सोमवार बाजार, एकात्मता चौक, सटाणा नाका, सरदार चौक, गूळ बाजार, मोसम चौक, नवीन बसस्थानक, कुसुंबा रोड यासह अनेक ठिकाणी फळे, भाजीपाला व इतर साहित्य विक्री करणाऱ्या शेकडो हातगाड्या लागतात. अचानक आलेल्या पावसामुळे या व्यावसायिकांची धावपळ उडाली.

दमदार पावसामुळे रस्ते- गटारींना नाल्याचे स्वरुप आले होते. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. येथील मसगा महाविद्यालय, पोलिस कवायत मैदान, एकात्मता चौक, भाजी मार्केट, स्टेट बँक चौक या ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले होते. वाहनचालकांना पाण्यातून वाहन चालवितांना कसरत करावी लागत होती.

पोलिस कवायत मैदानाजवळील साचलेले पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा नसल्याने ते थेट पाणी शासकीय विश्रामगृहात शिरत होते. एकात्मता चौकात पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी गटार नाही त्यामुळे सर्व पाणी नेहमीच रस्त्यावर येते. हा रस्ता रहदारीचा मुख्य स्त्रोत आहे. या पाण्यामुळे पायी जाणाऱ्या शाळेतील विद्यार्थी, नागरिक, वाहनचालक व व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

हेही वाचा: Nashik Crime News : कार चालकाकडून बसचालकावर हल्ला; चालक, वाहक जखमी

चाळीतच सडतोय कांदा

सातत्याच्या पावसामुळे परिसरातील गिरणा, मोसमसह लहान-मोठ्या नद्यांना पुन्हा पुरपाणी आले आहे. नद्या, नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले आहे. मका व बाजरी काढण्याचे काम वेगात सुरु आहे. अचानक आलेल्या पावसामुळे मका व बाजरीचे कणसे झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली.

काही ठिकाणी कणसे पावसात भिजली. शेतात पाणी असल्यामुळे बहुसंख्य ठिकाणी शेतकऱ्यांनी मका व बाजरीची कणसे खुडून घेतली आहेत. राखून ठेवलेला उन्हाळी कांदा चाळींमध्येच सडू लागला आहे. मिळेल त्या भावात शेतकरी कांद्याची विक्री करीत आहेत. शेतातून कांदा बाजारात आणण्याची देखील शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. पावसामुळे शेती कामावर मोठा परिणाम होत आहे.

हेही वाचा: Sakal Special : मराठी शाळा बंद करण्याचा घाट?; कमी पटसंख्येच्या राज्यात 14 हजार 985 शाळा