esakal | नाशिकमध्ये वरुणराजाची जोरदार हजेरी; उत्तर महाराष्ट्रात २५ पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज
sakal

बोलून बातमी शोधा

nashik rain

नाशिकमध्ये वरुणराजाची जोरदार हजेरी; पेरण्यांना वेग

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात सक्रिय मॉन्सूनने जोरदार हजेरी लावण्यास सुरवात केली. हवामानशास्त्र अभ्यासकांनी उत्तर महाराष्ट्रात २५ जुलैपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. या पावसामुळे भूजल आणि धरणांतील साठा वाढण्यासोबत खरिपाच्या खोळंबलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे. बुधवारी (ता.२१) सकाळी आठला संपलेल्या चोवीस तासांत नाशिक जिल्ह्यात सरासरी १४.१, धुळ्यात ५.२, नंदुरबारमध्ये ७.१, जळगावमध्ये ८.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. संततधार पाऊस होत असल्यामुळे आज (ता.२२) गोदावरी नदी भरून वाहू लागली आहे, पाण्याबरोबर पानवेली गवत वाहून आले आहेत. (heavy-rain-in-Nashik-North-Maharashtra-rain-forecast-jpd93)

(फोटो - केशव मते)

वरुणराजाने बुधवारी (ता. २१) दिवसभरात नाशिक शहर व परिसरात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे स्मार्टसिटीच्या कामांसाठी उखडलेल्या रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य होते. तालुकानिहाय नोंदविलेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा : नाशिक- ११.१, मालेगाव- ०.९, बागलाण- २, कळवण- ५.३, नांदगाव- ०.५, सुरगाणा- ४६.९, दिंडोरी- १९, इगतपुरी- ५६.२, पेठ- ६०.३, निफाड- २.३, सिन्नर- ४.९, येवला- ०.५, चांदवड- ५.६, त्र्यंबकेश्‍वर-५७.६, देवळा- १.१. त्र्यंबकेश्‍वर आणि धरणाच्या क्षेत्रात संततधार सुरू असल्याने नाशिककरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणाऱ्या गंगापूर धरणातील जलसाठा ३७.१९ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. इतर धरणांतील जलसाठ्याची टक्केवारी अशी ः दारणा- ६०.५१, मुकणे- २५.३२, भावली- ७३.८५, वालदेवी- ६६.२८, कश्‍यपी- २०.०३, गौतमी गोदावरी- १६.९५, कडवा- १३.७४, आळंदी- ६.७५, भोजापूर- १३.८५, पालखेड- २९.५३, करंजवण- ७.७१, ओझरखेड- २५.५३, वाघाड- ४.६४, तिसगाव- ०.७०, पुणेगाव- ६.६८, नांदूरमध्यमेश्‍वर- १००, चणकापूर- १३.२३, हरणबारी- ३९.२८, केळझर- १७.६६.

जिल्ह्यात ठळक मुद्दे

पावसासोबत वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा गोंगाट ऐकायला मिळत आहे. इगतपुरीमध्ये वाऱ्यासह रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू राहिला. इगतपुरी शहरातील अनेकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. पेठ तालुक्यात संततधार सुरू असल्याने नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. भुवन घाटात दरड कोसळल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्र्यंबकेश्‍वरमधील संततधारेमुळे ब्रह्मगिरी पर्वतावरील पायऱ्यांवरून पाण्याचे लोट वाहत होते. डांगसौंदाणे भागात सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू होता. हीच परिस्थिती जायखेडा भागात राहिली. चांदवड तालुक्यात संततधारेमुळे कांद्याच्या रोपांना फटका बसला.

गोदावरीत गटारीचे शिरले पाणी

नाशिक शहर आणि परिसरात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी गोदावरीमध्ये मिसळले आहे. गटारींच्या पाण्यामुळे दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत नदीतील पाण्याची पातळी पोचली आहे. त्यामुळे जोरदार पावसास सातत्य होईपर्यंत नदीकाठच्या रहिवाशांना दुर्गंधीला तोंड द्यावे लागेल, असे दिसते.

loading image