
Helmet Drive : विनाहेल्मेट नाशिककरांना ‘दणका’; दंडात्मक कारवाईचे 8 पॉइंट केले ‘Tweet’
नाशिक : शहर हद्दीमध्ये यापूर्वीही हेल्मेटसक्ती होतीच. परंतु गुरुवार (ता. २) पासून आणखी काटेकोरपणे अंमलबजावणी झाली. हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकीस्वारांचे समुपदेशन करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यातून वाहतूक शाखेला लाखोंचा महसूल प्राप्त झाला असला तरी, हेल्मेटचा वापर वाढावा या उद्देशाने सदर कारवाई वाहतूक पोलिसांकडून केली जात आहे. हेल्मेट वापरासंदर्भात चालढकल करणाऱ्यांना कारवाईमुळे हेल्मेटचा वापर करण्यास भाग पाडले. (Helmet Drive in city Bang to helmetless bike riders 8 points of penal action Tweet by police Nashik news)

दुचाकीस्वारांचे समुपदेशन करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी गुरुवारी सकाळी नाशिक शहर पोलिस या ट्विटर हॅण्डलवरून शहरातील आठ पॉइंटवर हेल्मेट तपासणी मोहीम राबविली जाणार असल्याचे ‘ट्विट’ केले होते. त्यानुसार वाहतूक शाखेने ट्विट केलेल्या पॉइंटवर सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत तर, सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत विनाहेल्मेट दुचाकी चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. त्यावरून अनेक ठिकाणी वादाचेही प्रसंग उद्भवले.
तर काही ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचे समुपदेशनही करण्यात येत होते. शहर वाहतूक शाखेच्या चार विभागांमध्ये हेल्मेटसक्ती मोहीम राबविली. पंचवटी, सरकारवाडा, नाशिक रोड आणि अंबड या चारही विभागातील वाहतूक पोलिस निरीक्षकांसह सुमारे १५० वाहतूक पोलिस कर्मचारी या मोहिमेसाठी रस्त्यावर उतरले होते.
कारवाईचे पॉइंट ट्विट
* स्वामी नारायण चौक * संतोष टी पॉइंट * एबीबी सर्कल * अशोक स्तंभ * गरवारे पॉइंट * पाथर्डी फाटा * बिटको चौक * बिटको कॉलेज
हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

उद्याच्या ट्विटकडे लक्ष
आयुक्त नाईकनवरे शहर पोलिस या ट्विटर हॅण्डलवरून दररोज नवनवीन पॉइंट ट्विट करतील. त्याप्रमाणे वाहतूक पोलिस त्या पॉइंटवर मोहीम राबवणार जाणार आहे. ट्विट केल्याने नाशिककरांना कारवाईची आगाऊ सूचना मिळेल, तसेच हेल्मेट परिधान करूनच ते घराबाहेर पडतील अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पहिल्या दिवसाची कारवाई
विनाहेल्मेट दुचाकीस्वार : 554 चालक
दंडात्मक कारवाई : 2 लाख 70 हजार रुपयांचा दंड
‘सकाळ’ची भूमिका : वाहनचालकांनी प्रतिसाद द्यावा
हेल्मेटसक्ती ही दुचाकीस्वारांच्या संरक्षणासाठीच आहे. हेल्मेट वापरल्याने प्राणांकित वा गंभीर दुखापतीपासून बचाव होण्याचीच शक्यता अधिक असते. विनाहेल्मेट अपघात होऊन जीव गमाविणाऱ्यांच्या कुटुंबीयांवर जो प्रसंग उद्भवतो तो भीषण असाच असतो. त्यामुळे हेल्मेट वापरण्याबाबत ‘सकाळ’ माध्यम समूहाची स्पष्टपणे समर्थनाचीच भूमिका राहील. नाशिककर म्हणून आपणही सर्वांनी पोलिसांच्या या मोहिमेला प्रतिसाद द्यावा असे आवाहन ‘सकाळ’ माध्यम समूह करीत आहे.
"दुचाकीचालक कामासाठी घराबाहेर पडताना कपडे, बूट, जेवणाचा डबा घेऊन बाहेर पडतो. त्याचप्रमाणे हेल्मेटही घेऊन बाहेर पडला तर त्याचा त्रास का? ‘सर सलामत तो पगडी पचास’ हे बोधवाक्य जरी प्रत्येकाने लक्षात ठेवले तर पोलिसांना अशी कारवाई करण्याची वेळ येणार नाही. नाशिककरांनी बोध घ्यावा आणि प्रत्येक दुचाकीचालकाने हेल्मेट वापरावे."
- जयंत नाईकनवरे, पोलिस आयुक्त.