फोटो -NSK26H34108
दीपक देशमुख - NSK26H34110
दगडांत कोरलेले झोडगेचे स्थापत्यवैभव
---------------------------------
दीपोत्सवाने उजळते ऐतिहासिक शिवालय
मालेगाव-धुळे महामार्गावरील झोडगे येथील तेराव्या शतकातील हेमाडपंथी शिवालय म्हणजे भारतीय शिल्पकला आणि स्थापत्यवैभवाचा अप्रतिम नमुना आहे. दगडांवर कोरलेली पौराणिक शिल्पे, वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि प्रकाशाचा अचूक वापर यामुळे हे मंदिर अभ्यासकांसह पर्यटकांचेही लक्ष वेधून घेते. ऐतिहासिक, धार्मिक आणि कलात्मक महत्त्व असलेल्या या मंदिराच्या जतन-संवर्धनातून परिसराच्या पर्यटनविकासालाही मोठी संधी उपलब्ध होऊ शकते.
- दीपक देशमुख, झोडगे
यादवकालीन राजा रामदेवराय यांच्या काळात हेमाद्री पंडितांनी मंदिर स्थापत्याला स्वतंत्र ओळख दिली. चुन्याचा वापर न करता केवळ दगडांच्या साहाय्याने उभारलेल्या मंदिरांना हेमाडपंथी शैली म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील अशाच मंदिरांच्या मालिकेत झोडगे येथील शिवालयाचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. गावाच्या दक्षिणेला झोटिंग डोंगराच्या पायथ्याशी हे मंदिर उभारण्यात आले आहे. परिसरातील टिकाऊ पाषाणांचा वापर करून त्यावर कलावंतांनी अप्रतिम शिल्पकला साकारली आहे.
नागर स्थापत्यशैलीतील या मंदिराच्या बाह्यरचनेवर पौराणिक प्रसंग, पशुशिल्पे, महिरपी आणि लहान मंदिरांच्या प्रतिकृती कोरलेल्या आहेत. प्रशस्त प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश केल्यानंतर अखंड दगडांत घडविलेले अलंकृत खांब लक्ष वेधतात. सभामंडपातील अप्सरांची नृत्यशिल्पे, वादकांच्या मूर्ती आणि भोगमंडप स्थापत्यकौशल्याची साक्ष देतात. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरील कासव, यक्ष-किन्नरांची शिल्पे आणि मध्यभागी असलेली गणेशमूर्ती मंदिराच्या धार्मिक संकल्पनेचे दर्शन घडवितात. कमी उंचीच्या प्रवेशद्वारातून दोन पायऱ्या उतरून गाभाऱ्यात गेल्यानंतर उत्तराभिमुख शिवलिंगाचे शांत, सात्त्विक दर्शन घडते. सूर्यप्रकाशाचा गाभाऱ्यात होणारा प्रवेश हेही या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.
महाशिवरात्रीला येथे मोठा यात्रोत्सव भरतो. तर मंदिराचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी स्थानिक तरुण दीपावली पाडव्याला हजारो दिव्यांचा दीपोत्सव आयोजित करतात. त्यामुळे पर्यटकांची संख्याही वाढत आहे. दीपोत्सवाच्या माध्यमातून नव्या पिढीला आपल्या ऐतिहासिक वारशाची ओळख करून देण्याचा स्तुत्य प्रयत्न होत आहे. महामार्गालगत असल्याने देशी-विदेशी पर्यटकांसाठी हे मंदिर आकर्षणाचे केंद्र ठरू शकते. मंदिराचा ऐतिहासिक परिचय, शिल्पवैशिष्ट्ये आणि परिसरातील पर्यटनस्थळांची माहिती उपलब्ध करून दिल्यास पर्यटकांचा ओघ वाढण्यास मदत होईल. पुरातत्त्व विभागाने काही सुधारणा केल्या असल्या, तरी मंदिराच्या सर्वांगीण जतन-संवर्धनासाठी अधिक व्यापक प्रयत्नांची गरज आहे. काही शिल्पांची झालेली तोडफोड आणि भग्नावशेषांची झालेली हानी चिंताजनक आहे. स्थानिक ग्रामस्थ, पर्यटक आणि पुरातत्त्व विभाग यांनी समन्वयातून या वारशाचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. नियमित देखभाल, जनजागृती आणि शास्त्रीय पद्धतीने संवर्धन केल्यास झोडगेचे हे शिवालय महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मानबिंदू ठरू शकते.
आख्यायिका
हेमाद्री पंडित उर्फ हेमाड पंडित हा ''रामदेवराय यादवांचा'' (तेराव्या शतकातला) राज्याचा ''श्रीकरानाधिप'' म्हणजेच अर्थमंत्री होता व रामदेवराय यादवांचा मुख्य प्रधान होता. साहित्य, शिल्प, धर्म, तीर्थयात्रा या सर्वात त्याला रुची होती. त्याने भारतीयांची धार्मिक वृत्ती व तीर्थयात्रेमागील भक्तिभाव लक्षात घेऊन ठिकठिकाणी, देवालय बांधण्याचे व्यापक पुण्यकर्म हाती घेतले. त्यात स्वतःचा खास ठसा उमटवून गेला. मंदिर बांधकामात चुन्याचा वापर न करता केवळ दगडात मंदिर बांधण्याची पद्धत हेमाद्री पंडिताने सुरू केली. ही देवालये ''हेमाडपंथी'' म्हणून शिल्पवैशिष्ट्यांनी प्रसिद्ध झाली. महाराष्ट्र व अन्य प्रांतात आजही ही देवालये बाराव्या-तेराव्या शतकातील वैभवशाली शिल्पकलेचा, स्थापत्याचा उत्तम बोलका पुरावा आहे.