NSK26H34522
जळगाव : गुन्हे शाखेने अटक केलले संशयितांबरोबर पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक संदीप गावित व पथक.
---
वरणगाव गोळीबार प्रकरण (लोगो)
---
इन्स्टाग्रामवर तरुणीच्या नावाने ‘हनीट्रॅप’
---
अपमानाचा बदला घेण्यासाठी रचला कट; दोघे स्थानिक गुन्हेशाखेच्या जाळ्यात
सकाळ वृत्तसेवा
जळगाव/भुसावळ, ता. ४ : मुक्ताईनगर तालुक्यातील एका तरुणाला इन्स्टाग्रामवर तरुणीच्या नावाने बनावट खाते तयार करून ''हनीट्रॅप''द्वारे वरणगाव येथे बोलाविले. तर दोघांनी त्याच्यावर गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी गुन्हे शाखेने दोघांना अटक केली असून, जुन्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हा कट रचल्याचे दोघांनी पोलिसांकडे कबूल केले आहे.
मुक्ताईनगरात काझीपुऱ्यातील सरफराज सय्यद सकिर सय्यद (वय २४) याला रविवारी (ता. १) सायंकाळी @ashwi_ni2083 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मेसेज व कॉल करून वरणगाव येथील फुलगाव उड्डाणपुलाखालील सेवा रस्त्यावर भेटण्यासाठी बोलावले. सरफराज तेथे पोहोचताच इस्टाग्रामवरील ती मुलगी आली नाही. मात्र, त्याच्या पाळतीवर असलेल्या दोघांनी त्यांच्या डोक्यावर व पायावर लोखंडी रॅाडने हल्ला करून गंभीर जखमी केले, तसेच त्यांनी गावठी कट्ट्यातून २ राऊंड गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला व पळून गेले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, उपनिरीक्षक सोपान गोरे व सायबर सेलच्या पथकाने अवघ्या ४५ मिनिटांत डिलिट केलेले इन्स्टाग्राम खाते व संशयितांचा माग काढला. स्थानिक गुन्हे शाखेने संशयितांची माहिती संकलित केली. त्यावरून संशयित भूषण ऊर्फ बिसला राजू सावळे (वय २०, रा. फेकरी, ता. भुसावळ), सिद्धार्थ रामदास ढिवरे (२७, ग्रामपंचायत सब-ठेकेदार, रा. फेकरी, ता. भुसावळ) यांना अटक करून वरणगाव पोलिसांच्या स्वाधीन केले.
मृत्यूपूर्वी मित्राने दिली पिस्तूल
गुन्ह्यात वापरलेली गावठी पिस्तूल संशयिताचा साथीदार सागर कहर (रा. भुसावळ) याने अपघातात मरण पावण्यापूर्वी भूषणला दिल्याचे निष्पन्न झाले असून, मृत सागर कहर याच्यावरही भुसावळ शहर पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.