पान तीन
-----------------
27548
येवला : क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती कार्यक्रमात अभिवादन करताना समाजबांधव.
विषमता अन अन्यायाविरोधात संघटित लढ्याची गरज
भगवान चित्ते : क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवेंना अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१७ : आजही दलितांवरील अत्याचार आणि हत्याकांडाच्या घटना घडत असून, दुसरीकडे अन्यायाविरोधात लढणाऱ्या सामाजिक चळवळी क्षीण होत आहेत. समाजातील विषमता आणि अन्यायाविरोधात पुन्हा एकदा संघटित लढ्याची गरज असल्याचे प्रतिपादन भगवान चित्ते यांनी केले.
येथील अण्णा भाऊ साठे स्मारकात क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या २३२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कॉम्रेड चित्ते बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लहुजी वस्ताद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी चित्ते यांनी, लहुजी वस्ताद साळवे यांच्या सामाजिक कार्याचा आणि त्यांच्या कुटुंबाच्या शैक्षणिक योगदानाचा उल्लेख केला. लहुजी वस्ताद यांची नात मुक्ता साळवे या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मुलींच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या पहिल्या दलित विद्यार्थिनींपैकी एक होत्या. त्यांनी त्या काळात ‘आम्ही धर्म नसलेली माणसे’ या निबंधातून तत्कालीन समाजव्यवस्थेला परखड प्रश्न विचारत सामाजिक विषमतेवर भाष्य केले होते, असे चित्ते यांनी सांगितले.
नितीन संसारे, जितेंद्र गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास ऑल इंडिया पँथर सेनेचे संदीप पगारे, मुकुंद साठे, सचिन खैरनार, दीपक गायकवाड, रावसाहेब नागरे, विशाल शेलार, प्रवीण अहिरे, किरण अहिरे, मनोज हिवाळे, आकाश साठे, तुषार खैरनार, संजय खाजेकर, संदीप खळे, लवकुश साठे आदीं उपस्थित होते.