पान-४ अँकर
फोटो- 13663
धुळे : निवृत्त शिक्षकांच्या वार्षिक सभेप्रसंगी उपस्थित मान्यवर.
निवृत्त शिक्षकांचे योगदान कौतुकासपद
मनोहर भदाणे : धुळ्यात निवृत्त शिक्षकांची वार्षिक सभा
कापडणे, ता. १८ : निवृत्त शिक्षकांनी आयुष्यभर समाज जडणघडणीत योगदान दिलेले असते. ते कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे यांनी सांगितले.
धुळे शहरातील देवपूरमधील पेन्शनर भवनात जिल्हा निवृत्त प्राथमिक शिक्षक सेवा संघाची वार्षिक सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते.
पेन्शनर संघाचे कार्याध्यक्ष वसंतराव वाबळे, नाशिक विभागाचे उपाध्यक्ष द. मा. ठुबे, छत्रपती संभाजीनगरचे उपाध्यक्ष वसंतराव सबनीस, जळगाव जिल्हाध्यक्ष स. ना. सोनवणे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष मधुकर साबळे, नाशिक जिल्हाध्यक्ष बा. र. खैरनार, धुळे जिल्हा अध्यक्ष अनंतराव साहेबराव पाटील, सरचिटणीस जिजाबराव दामू पाटील, उपाध्यक्ष रमेश सुकदेव पाटील, खजिनदार सुभाष भामरे, संचालक शांतिलाल पाटील, आधार पाटील, हिंमतराव देवरे, अनंत भामरे, युवराज वाघ, ध्रुव अहिरराव, बापू चौधरी आदी उपस्थित होते.
माजी अध्यक्ष भदाणे म्हणाले, की शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार आहे. निवृत्तीनंतरही त्यांच्या समस्या, अडचणींकडे दुर्लक्ष करता येणार नाही. संघटनेच्या माध्यमातून आपण सर्वांनी एकजुटीने राहावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
दरम्यान, या सभेत निवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. निवृत्त शिक्षकांना भेडसावणाऱ्या समस्या संघटनेच्या माध्यमातून सोडविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. किशोर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सरचिटणीस जिजाबराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. सतीश शिंदे यांनी आभार मानले.