लेख क्र. १
---------
दिवाळी अंकासाठी लेख (प्रवासाची बॅग कशी भरायची)
फोटो - NSK26H33733 प्रवीण मानकर
फोटो - NSK26H33734 रकसॅक
उपशीर्षक
पर्यटनाला जाताना, अशी भरावी बॅग
मुख्य शीर्षक
बॅकपॅकरची बॅग... एक आश्चर्य!
एकदा प्रवासाला निघायचे ठरले की, प्रश्न पडतो की, प्रवासाची बॅग कशी भरायची? कोणत्या वस्तू सोबत न्यायच्या? प्रवासात काही कमी तर पडणार नाही ना..? याचा काहींना ताण देखील येतो तर, प्रवासापूर्वी काहींचा कुटुंबात वाद देखील होतो. आता प्रत्येक वस्तूला वजन असते आणि सर्व वस्तू एकत्रित केल्या तर साधारण २०-२५ किलो वजन भरते. मग अशावेळी बॅग तरी कशी भरायची, या संदर्भात...
- प्रवीण मानकर, नाशिक
प्रत्येक बरोबर घेतलेल्या वस्तूची प्रवासातली उपयुक्तता किती आहे. यावर प्रवासी मनोमन खल करत असतो आणि आतून उत्तर आले की ‘या वस्तूशिवाय आपला प्रवास सुखकर होणार नाही’ लगेच आपण ती वस्तू बरोबर घेतो आणि निर्धास्त होतो. प्रवासाच्या उद्देशाप्रमाणे आणि कालावधीनुसार कोणती ‘बॅग’ न्यायची यावर ते अवलंबून असते. शिवाय सामानाची ने-आण कोण करणार आहे यावर आपण किती किलो वजन नेणार आहे हे ठरवतो. जर स्वतःची गाडी असेल तर, बरेच प्रश्न मिटतात. ढोबळमानाने प्रवासाचे तीन भागात वर्गीकरण करता येते. पर्यटन, बॅकपॅकिंग आणि ट्रेकिंग. या तिन्ही प्रकारच्या प्रवासाचे नियोजन, उद्देश आणि कालावधी वेगळा असतो. त्यामुळे प्रवासात लागणारे सामान वाहून नेण्यासाठी लागणाऱ्या सुविधा सुद्धा वेगळ्या असतात. सामान भरताना ‘पाहिजे ती वस्तू पटकन मिळाली पाहिजे‘ अशी काळजी घ्यावी. त्यामुळे जे सामान भरतो त्याने वस्तू कुठे ठेवली आहे हे लक्षात येते.
अवघड प्रवासासाठी ‘रकसॅक’
प्रवासात साधारणपणे लवचिक किंवा रिजिड प्लास्टिकची बॅग भरली जाते. कपडे व्यवस्थित घडी करून ठेवता येतात. खाण्याच्या वस्तू चांगल्या प्रकारे ठेवता येतात. बहुतांशी लोक बॅग भरूनच प्रवास करतात. ‘रकसॅक’ कठीण ट्रेकिंग किंवा मोठ्या मोहिमांसाठी बनवलेली असते. रकसॅकला अनेक खिसे असतात आणि प्रत्येक पॉकेटचा उद्देश वेगवेगळा असतो. रकसॅक प्रवास करणाऱ्याच्या खांद्याला अडकवलेली असते. ट्रेकिंग करताना विविध प्रकारची छोटी मोठी उपकरणे न्यावी लागतात. त्यामुळे प्रत्येक वस्तूला जागा असते आणि प्रत्येक जागेवर नेमकी वस्तू ठेवल्यास पाहिजे तेव्हा वस्तू लगेचच मिळते. गिर्यारोहण करताना आपली रकसॅक आपल्यालाच न्यावी लागते म्हणून गिर्यारोहक वजनाच्या बाबतीत खूप सतर्क असतो. औषधे, दोऱ्या, हुक्स, प्रसाधन किट नेहमी लागणाऱ्या वस्तूंची जागा वरच्या बाजूला असते. प्रवासात लागणारी कागदपत्रे ही बॅगेच्या तळात किंवा ‘चोर खिशात‘ ठेवावी. कपड्यांच्या घड्या न करता ‘रोल्स’ करावे. त्यामुळे जागा व्यवस्थित वापरली जाते आणि पाहिजे ती कपड्याची जोडी सहज काढता येते. ट्रेकिंग रकसॅकची क्षमता लिटरमध्ये मोजली जाते. साधारणपणे ३५ ते १०० लिटर किंवा त्याहून अधिक. रकसॅकचे डिझाइन आणि सामान ठेवण्याची पद्धत थोडी वेगळी असते. वरच्या बाजूने दोरीने ओढून बंद करण्याचे तोंड असते आणि त्यावर बक्कल असणारे झाकण असते. यात एकच मोठा कप्पा असतो, ज्यात तंबू, स्लिपिंग बॅग आणि कपडे भरले जातात. तसेच बाहेरून ट्रेकिंग पोल्स किंवा मॅट बांधण्यासाठी बेल्ट्स असतात. यात वजन पेलण्यासाठी कंबरेला जाड पॅडेड बेल्ट दिलेला असतो. यामुळे बॅगचे ६० ते ८० टक्के वजन खांद्यांवर न पडता कंबरेवर आणि पायांवर विभागले जाते, ज्यामुळे जड सामान घेऊन मैलोंमैल चालणे सोपे होते.
बॅकपॅकिंग कशी असावी?
बॅकपॅकिंग पद्धतीने प्रवास करताना मात्र बॅकपॅक वापरावी. बॅकपॅक रोजच्या साध्या वापरासाठी डिझाईन केलेल्या असतात. दीर्घकालीन प्रवासासाठी साधारण पणे बॅकपॅकचे वजन, सामानासह, १०-१२ किलो असावे. बॅकपॅकचे डिझाईन आणि सामान ठेवण्याची पद्धत खूप वेगळी असते. यात वस्तू ठेवण्यासाठी झिप असतात. ही बॅग सरळ उघडून त्यात लॅपटॉप, वह्या, पेन आणि पाण्याच्या बाटल्या व्यवस्थित रचून ठेवता येतात. याचे वजन प्रामुख्याने खांद्यावर आणि पाठीच्या वरच्या भागावर येते. त्यामुळे यात जास्त जड सामान भरता येत नाही. बॅकपॅकर्स दिवसभरात १५-२० किमीपर्यंत चालतात. त्यांची बॅकपॅक नेहमी त्यांच्याबरोबर असते. मिनिमलिझम म्हणजेच मराठीत ‘किमानता’ किंवा ‘किमान चौकटीत राहण्याची जीवनशैली’ बॅकपॅकर अवलंबतो. कमीतकमी गोष्टींचा वापर करून, त्यातून जास्तीत जास्त आनंद, समाधान आणि मोकळेपणा मिळवणे हाच त्याचा उद्देश असतो. अनावश्यक गोष्टींपासून मुक्तता मिळवून किंबहुना अति आवश्यक वस्तूच तो सॅकमध्ये भरतो. बॅकपॅकर कधीही स्मरणिका विकत घेत नाही कारण त्याला सामान, वजन वाढवायचे नसते. बॅकपॅक भरताना वेळ आणि ऊर्जेची बचत कशी होईल ते बघावे. बॅगेत किंवा मनात नको असलेला गोंधळ कमी केल्यामुळे मानसिक ताण कमी होतो. ‘वस्तूंपेक्षा अनुभवांना, नात्यांना आणि आरोग्याला जास्त महत्त्व देणे’ याला तो प्राधान्य देतो. थोडक्यात, प्रवासाची बॅग भरताना नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास प्रवास सोयीचा आणि तणावमुक्त होतो. बॅग भरण्याचा मुख्य उद्देश कमी वजनात, सर्व आवश्यक वस्तू व्यवस्थित आणि गरजेच्या वेळी सहज मिळतील अशा पद्धतीने ठेवणे असतो. जिन्स, जॅकेट यांसारखे जड कपडे बॅगेच्या तळाशी ठेवा आणि हलके कपडे वर ठेवा. शूज किंवा चपला बॅगेच्या कडेला किंवा तळाशी ठेवा. टूथब्रश, पेस्ट, साबण, शाम्पू यांसारख्या वस्तू एका वॉटरप्रूफ पाऊचमध्ये ठेवा, जेणेकरून काही सांडल्यास कपडे खराब होणार नाहीत. प्रसाधनांच्या बाटल्या लहान आकाराच्या असाव्यात. सर्व चार्जर, पॉवर बँक आणि केबल्स एका वेगळ्या लहान बॅगेत एकत्र ठेवा.
(लेखक स्वतः बॅकपॅकर, ब्लॉगर आणि व्याख्याते आहेत.)