(पान ४ ला पट्टा)
-----------
पटेल कन्या विद्यालयाची
विभागीय स्पर्धेसाठी निवड
शिरपूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे यांच्या वतीने धुळे येथील गरुड मैदानावर आयोजित शालेय जिल्हास्तरीय खो- खो स्पर्धेत येथील एच. आर. पटेल कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या १४ वर्षे वयोगटातील संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर अजिंक्यपद पटकावले. या संघाची धुळे येथे होणाऱ्या विभागीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संघात वेदिका येवले, दर्शिका जाधव, हर्षाली कोळी, राधिका पवार, गुंजन गायकवाड, कनक साळुंखे, गार्गी माळी, हेमांगी पाटील, वंशिका देशमुख, लावण्या रोकडे, रजनी रांजण, धनश्री कोळी आणि ज्योती पावरा यांचा समावेश आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव रेषा पटेल, क्रीडा चेअरमन प्रितेश पटेल, सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्राचार्य एस. जे. पाटील व पर्यवेक्षक बी. बी. अग्रवाल यांनी समाधान व्यक्त केले. संघाला क्रीडा शिक्षिका मयुरी भामरे, प्रशिक्षक करण शिंदे व सागर माळी यांचे मार्गदर्शन लाभले.
योगासन स्पर्धेत
शिरपूरच्या खेळाडू चमकल्या
शिरपूर : तालुकास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत येथील एच. आर. पटेल कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी विविध वयोगटांत घवघवीत यश मिळवत धुळे येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये १४ वर्षांखालील गटात प्रणवी बडगुजर व काव्यांजली बोरसे, १७ वर्षांखालील गटात हर्षिता वाघ व जीविका सोनवणे, तर १९ वर्षांखालील गटात याज्ञेश्वरी गिरासे, वंशिका राखेचा आणि लावण्या मराठे यांचा समावेश आहे. त्यांच्या यशाचे संस्थाध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, सचिव रेशा पटेल आणि प्राचार्य एस. जे. पाटील यांनी कौतुक केले. खेळाडूंना क्रीडाशिक्षिका मयुरी भामरे यांचे मार्गदर्शन लाभले.
पटेल सैनिकी विद्यालयात
गांधी-शास्त्री जयंती साजरी
शिरपूर : तांडे (ता. शिरपूर) येथील मुकेशभाई आर. पटेल मुला-मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक तथा प्राचार्य दिनेशकुमार राणा यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. देवेश पाटील याने महात्मा गांधी यांच्या विचारांवर, तर जयेश चावरे याने लालबहादूर शास्त्री यांच्या योगदानावर मनोगत व्यक्त केले. शिक्षिका सुवर्णा माळी यांनी महापुरुषांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता स्पष्ट केली. प्राचार्य दिनेशकुमार राणा यांनी तरुण पिढीने वाचन संस्कृती टिकवून महापुरुषांचे विचार आचरणात आणावेत, असे आवाहन केले. विद्यार्थिनी संस्कृती टापरे हिने सूत्रसंचालन केले.
एसआरबी शाळेत
वन्यजीव सप्ताह साजरा
शिरपूर : दहिवद (ता. शिरपूर) येथील एस. आर. बी. इंटरनॅशनल शाळेत वन्यजीव सप्ताह नुकताच साजरा करण्यात आला. वनविभाग धुळे व वन परिक्षेत्र शिरपूर यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात वन क्षेत्रपाल सुनील जोग यांनी वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व आणि उपाययोजनांवर मार्गदर्शन केले. सुळे परिक्षेत्राच्या वन परिमंडल अधिकारी के. बी. धात्रक यांनी प्रत्येकाने एक झाड लावण्याचे आवाहन केले. वनरक्षक विजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीव रक्षणाची शपथ दिली. संस्थाध्यक्ष डॉ. धीरज बाविस्कर यांनी संवर्धनातील मानवी भूमिकेवर विचार मांडले. संस्थापक अध्यक्षा भाग्यलक्ष्मी बाविस्कर, संचालिका मानसी बाविस्कर, मुख्याध्यापक सुभाषनाथ पटले, उपमुख्याध्यापिका निवेदिता दुबे आणि वन कर्मचारी उपस्थित होते. सीमा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. भाग्यश्री पटले यांनी आभार मानले.
एसआरबी शाळेत
गांधी- शास्त्री जयंती
शिरपूर : दहिवद (ता.शिरपूर) येथील सदाशिवशेठ आर. बाविस्कर इंटरनॅशनल शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी गांधीजींचे अहिंसेचे तत्त्व आणि शास्त्रीजींच्या ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेचा संदेश भाषणांतून दिला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शालेय परिसरात श्रमदान करून स्वच्छता करण्यात आली. विद्यार्थ्यांनी ‘रघुपती राघव राजा राम भजन’ सादर केले. संस्थापक अध्यक्षा भाग्यलक्ष्मी बाविस्कर, अध्यक्ष डॉ. धीरज बाविस्कर, संचालिका मानसी बाविस्कर, मुख्याध्यापक सुभाषनाथ पटले व उपमुख्याध्यापिका निवेदिता दुबे उपस्थित होते.
टेकवाडे शाळेत
गांधी- शास्त्री जयंती
शिरपूर : टेकवाडे (ता. शिरपूर) येथील आर. सी. पटेल प्राथमिक शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त २९ विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतून भाषणे सादर केली. विजेत्या विद्यार्थ्यांना शाळेतर्फे पारितोषिके देण्यात आली. तिसरी व चौथीच्या विद्यार्थिनींनी महापुरुषांच्या जीवनपटावर आधारित गीत सादर केले. मुख्याध्यापक किशोर सोनवणे यांनी गांधीजींचे कार्य, तर स्नेहल शिंदे यांनी शास्त्रीजींच्या जीवनप्रवासाची माहिती दिली. महेंद्र माळी, ज्योत्स्ना राजपूत, श्वेता धनगर, भाईदास पावरा, गोडम कोळी आदि उपस्थित होते. प्रशांत चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.
पटेल महाविद्यालयात
गांधी- शास्त्रींना अभिवादन
शिरपूर : येथील एच. आर. पटेल कला व विज्ञान महिला महाविद्यालयात जयंतीनिमित्त प्रभारी प्राचार्य डॉ. गजानन पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. डॉ. पाटील म्हणाले की, गांधीजींनी सत्य-अहिंसेचा तर शास्त्रीजींनी साधेपणाचा आदर्श दिला असून, आजच्या पिढीने हे विचार आत्मसात करावे. इतिहास विभागप्रमुख डॉ. एच. आर. चौधरी यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. आर. एम. वाडीले, डॉ. हेमकांत चौधरी, डॉ. रवी मोरे, प्रा. बी. आय. परदेशी, डॉ. एस. एम. देवरे, डॉ. मनीषा चौधरी आदी उपस्थित होते.