बिबट-मानव संघर्षापुढे वन विभागाची यंत्रणा अपुरी
कामाचा वाढता ताण; बिबट्यांच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वाढ
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : नाशिक जिल्ह्यात काही काळापासून मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. नागरीकरण आणि शेतीच्या विस्तारामुळे वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे वळत असल्याने वनविभागाच्या वन्यजीव बचाव पथकांवरील कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. विशेषतः नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील बिबट्यांचा वाढता वावर, शेतातील उघड्या विहिरीत पडलेले वन्यप्राणी, अपघातात जखमी झालेले पक्षी आणि सर्पमित्रांच्या मदतीने होणारे सर्पबचाव अशा विविध आपत्कालीन घटनांमध्ये पथकांना रात्रंदिवस धाव घ्यावी लागत आहे. एकाच वेळी अनेक ठिकाणांहून मदतीचे कॉल येत असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे.
जिल्ह्यातील मानव-बिबट संघर्ष चिंताजनक पातळीवर पोचला आहे. २०२५-२६ या वर्षात नाशिक जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यांत नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागावर मोठा दबाव असतो. या पार्श्वभूमीवर वनविभागाने जिल्ह्यात चार रॅपिड रिस्पॉन्स टीम कार्यान्वित करण्याची योजना मांडली होती. यासोबतच जखमी प्राण्यांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी म्हसरूळ येथे सुसज्ज वन्यजीव उपचार केंद्र आणि कायमस्वरूपी बिबट्या बचाव केंद्र उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. वाढत्या घटनांच्या तुलनेत आजही मनुष्यबळ आणि साधनसामग्री अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. अत्यंत धोकादायक बचाव मोहिमा यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी, सुसज्ज वाहने, मजबूत पिंजरे, प्राण्यांना भूल देण्याची अचूक साधने आणि आधुनिक उपकरणांची तातडीने उपलब्धता होणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि वन्यजीवांचे संवर्धन या दोन्ही बाजू सांभाळण्यासाठी शासनाने तातडीने निधी व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.