पत्नीच्या खून प्रकरणी पती दोषी
---
जिल्हा न्यायालयात उद्या शिक्षेवर सुनावणी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १९ : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन निर्घृणपणे खून केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने पतीला दोषी ठरविले आहे. शिक्षेवर अंतिम युक्तिवादासाठी न्यायालयाने बुधवार (ता. २१) तारीख निश्चित केली आहे.
राजेश जगन पावरा (वय २८, मूळ रा. भोईटी, ता. शिरपूर, जि. धुळे) तळोंदा दिगर (ता. चाळीसगाव) येथील एका शेतात पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता. २६ सप्टेंबर २०२३ ला रात्री चारित्र्याच्या संशयावरून त्याने पत्नीचा खून केला. याबाबत शेतमालकाच्या भाच्याने मेहुणबारे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तत्कालीन पोलिस अधिकारी विष्णू आव्हाड व संदीप परदेशी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जळगाव जिल्हा व सत्र न्यायाधीश. एस. व्ही. खोंगल यांच्या न्यायालयात सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदारांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या. सरकारी अभियोक्ता ॲड. प्रदीप एम. महाजन यांनी सर्व साक्षीदारांच्या पुरावा साखळी प्रभावीपणे जुळवून युक्तिवाद केला. उभयतांमध्ये झालेला युक्तिवाद, साक्षीदाराच्या साक्षीवर न्यायालयाने आरोपी राजेश जगन पावरा याला पत्नीचा खून केल्याप्रकरणी दोषी धरले आहे. पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार ताराचंद जावळे यांचे सहकार्य राहिले.