पत्नीच्या खून प्रकरणी पतीला जन्मठेप
---
चारित्र्याच्या संशयातून व दारू न दिल्याच्या कारणावरून मारहाण
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : धोंडेमाळ (ता. पेठ) येथे चारित्र्याच्या संशयातून, तसेच दारू न दिल्याच्या कारणावरून पत्नीला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून तिचा खून केल्याप्रकरणी आरोपी पतीला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. डी. वडणे यांनी बुधवारी (ता. ७) हा निकाल दिला. हिरामण भाऊराव गांगोडे (वय ५०, रा. धोंडेमाळ, ता. पेठ) असे आरोपीचे नाव असून, कुसुम गांगोडे असे मृत महिलेचे नाव आहे.
ही घटना २५ ऑगस्ट २०२५ ला मध्यरात्री घडली. कुसुम यांचे भाऊ हिरामण अमृता लोखंडे (रा. कसुली, ता. त्र्यंबकेश्वर) यांच्या फिर्यादीनुसार, आरोपी हिरामण हा दारूच्या नशेत घरी आला. त्याने पत्नी कुसुम यांच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर त्याने दारूची मागणी केली. कुसुम यांनी दारू देण्यास नकार दिल्यावर त्याने घरातील कुऱ्हाडीच्या दांड्याने त्यांना मारहाण केली.
मुलगी गुणवंती हिने आईला वाचविण्यासाठी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने तिलाही मारहाण केल्याने ती भीतीपोटी मैत्रिणीच्या घरी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी परतल्यावर कुसुम या मृतावस्थेत आढळून आल्या. या प्रकरणी पेठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक के. एस. कपिले यांनी तपास करून आरोपीला अटक केली. तपास पूर्ण झाल्यावर पोलिसांनी पुराव्यांसह दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे ॲड. रवींद्र निकम यांनी सहा साक्षीदार तपासले. सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने हिरामण गांगोडे याला जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात राठोड यांनी पैरवी अधिकारी म्हणून पाठपुरावा केला.