फोटो : H31213
नाशिक : आयसीएमएआय आणि सीएचएमई भोसला सैनिकी महाविद्यालय यांच्यातील सामंजस्य कराराप्रसंगी अध्यक्ष चित्तरंजन चट्टोपाध्याय, सीएचएमईएसचे सरकार्यवाह हेमंत देशपांडे, प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील.
--
आयसीएमएआय-भोसला महाविद्यालयात सामंजस्य करार
विद्यार्थ्यांना कॉस्ट अकाउंटन्सी, शाश्वततेच्या व्यावसायिक क्षेत्राशी जोडणार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३ : दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएमएआय) आणि सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी (सीएचएमईएस) संचालित भोसला सैनिकी महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार झाला. याअंतर्गत विद्यार्थ्यांना कॉस्ट अकाउंटन्सी, शाश्वततेच्या व्यावसायिक क्षेत्राशी जोडले जाणार आहे.
‘आयसीएमएआय’च्या सस्टेनेबिलिटी स्टँडर्ड्स बोर्ड आणि नाशिक चॅप्टरतर्फे शुक्रवारी (ता. २) समृद्धी परिषद घेण्यात आली. त्या वेळी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. कराराप्रसंगी आयसीएमएआयचे अध्यक्ष सीएमए चित्तरंजन चट्टोपाध्याय, सीएचएमईएसचे सरकार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे, सदस्य सीएमए दीपक जोशी, भोसला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र पाटील उपस्थित होते.
या करारानुसार दोन्ही संस्था शिक्षण, व्यावसायिक कौशल्यविकास आणि शाश्वतता या क्षेत्रांत संयुक्त उपक्रम राबवणार आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाच्या अनुषंगाने विशेषतः आयकर, जीएसटी, कॉस्ट ॲन्ड मॅनेजमेंट अकाउंटन्सी यासारख्या व्यवसायाची ओळख करून देणे, संबंधित क्षेत्रातील नावाजलेल्या प्रशिक्षकांना आमंत्रित करून प्रशिक्षण देणे, उद्योगजगताशी प्रत्यक्ष संपर्क घडवून आणणे आणि करिअरविषयक मार्गदर्शन देणे हा या कराराचा उद्देश आहे.
---चौकट
सर्व विद्यार्थ्यांना फायदा
या करारामुळे केवळ भोसलामधील नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. अधिकाधिक विद्यार्थी याविषयी प्रशिक्षण घेऊन कंपन्या, व्यवसायाशी जोडले जाणार आहे. त्यामुळे नाशिकमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. पाटील यांनी केले.
----