इगतपुरीत सणासुदीत भारनियमन
दुरुस्तीच्या नावाखाली तासन् तास फीडर बंद
सकाळ वृत्तसेवा
इगतपुरी, ता. ११ : तालुक्यातील पूर्व भागासह विविध भागांत व वाड्या-पाड्यात महावितरण उपविभागांतर्गत आठ दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिक त्रस्त आहेत. सततच्या वीजपुरवठ्यातील व्यत्ययामुळे उपकरणांच्या बिघाडाचा धोका वाढला असून, आर्थिक नुकसान होत आहे. दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार वीज बंद ठेवली जात असल्याने घरगुती कामांपासून ते व्यावसायिक व्यवहारांपर्यंत अनेक कामांवर परिणाम होत आहे.
दुसरीकडे पावसाअभावी शेतीला पाणी देण्यासाठी कृषिपंपांचा वापर वाढला असून, वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. विजेचा लपंडाव होत असतानाही चुकीच्या बिलांच्या तक्रारीही होत आहेत. बिल दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयात वारंवार तक्रारी करूनही प्रतिसाद मिळत नाही. एखादे बिल थकीत राहिल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई तत्परतेने केली जाते. मात्र वीजचोरीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे.
पूर्व भागातील टाकेद, खेड, इंदोरे, बारशिंगवे, अधरवड, बेलगाव तऱ्हाळे, पिंपळगाव मोर, धामणी, गोंदे, वाघेरे, माणिकखांब, मुंढेगाव परिसरातील नागरिकांच्या या प्रश्नांवर ग्रामपंचायतींसह स्थानिक लोकप्रतिनिधी किती पाठपुरावा करावा, असा सवाल उपस्थित होत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येवर तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे. पिंपळगाव मोर, धामणी, बेलगाव तऱ्हाळे, धामणगाव, भरवीर, निनावी, भंडारवाडी, अडसरे बुद्रुक, मायदरा, धानोशी, ठोकळवाडी, टाकेद खुर्द, खेड, टाकेद बुद्रुक, अडसरे खुर्द, टाकेद, चौरेवाडी, बांबळेवाडी, शिरेवाडी, घोडेवाडी, सोनोशी, बारशिंगवे, वासाळी, अधरवड, इंदोरे, आंबेवाडी, मांजरगाव, परदेशवाडी, भरवज, निरपण, काळुस्ते, कांचनगाव, खैरगाव, देवळे, माणिकखांब,
मुंढेगाव आदी गावांमध्ये विजेचा लंपजाव सुरू आहे.
देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी ज्योती एक्स्प्रेस फीडर, बारशिंगवे फीडर, बेलगाव फीडर, परदेशवाडी फीडर, टाकेद फीडर, पिंपळगाव फीडर बंद होते.