पान दोन मेन
----------------------
इगतपुरीत हजारो शिधापत्रिकाधारक ‘प्राधान्येतर कुटुंब प्रवर्गात’
आदिवासी बांधवांचेही धान्य बंद; पुरवठा विभाग, सेतू कार्यालयात नागरिकांची झुंबड
सकाळ वृत्तसेवा
घोटी, ता. २६ : इगतपुरी तालुक्यातील तब्बल ४ हजार ३०० शिधापत्रिका (एनपीएच) ‘प्राधान्येतर कुटुंब प्रवर्गात वर्ग झाल्याने अनेक शिधापत्रिकाधारकांचे स्वस्त धान्य बंद झाले आहे. याचा फटका काही आदिवासी बांधवांनाही बसल्याने गरजू कुटुंबांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. धान्याबाबत चौकशी करण्यासाठी आणि शिधापत्रिकेतील नोंदी दुरुस्त करून घेण्यासाठी नागरिकांची पुरवठा विभाग व सेतू कार्यालयात गर्दी होवू लागली आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून शिधापत्रिकाधारकांच्या उत्पन्नाची, आयकर भरण्याच्या स्थितीची तसेच विविध पदांवरील कार्यरत व्यक्तींच्या पात्रतेची पडताळणी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. या प्रक्रियेत काही शिधापत्रिकाधारक प्राधान्येतर कुटुंब प्रवर्गात वर्ग झाल्याने संबंधित कुटुंबांना मिळणारे धान्य बंद झाले आहे. मात्र, या कारवाईचा फटका काही आदिवासी बांधवांनाही बसल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. रोजच्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करणाऱ्या गरीब व आदिवासी कुटुंबांचे धान्य बंद झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हातावर पोट असलेल्या कुटुंबांना आता धान्य मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिधापत्रिका प्राधान्येतर कुटुंब प्रवर्गात का वर्ग झाली?, धान्य पुन्हा सुरू करण्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागेल आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याची माहिती घेण्यासाठी नागरिक पुरवठा विभाग आणि सेतू कार्यालयात गर्दी करत आहेत. नागरिकांच्या वाढत्या गर्दीमुळे कार्यालयीन कामकाजावरही ताण येत आहे. इगतपुरी तालुक्यातील या प्रश्नावर अन्न व नागरी विभाग, पुरवठा विभाग काय भूमिका घेतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
-----------
धान्याचा प्रश्न ऐरणीवर
आदिवासी बहुल इगतपुरी तालुक्यात गरीब व गरजू कुटुंबांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून मिळणारे धान्य हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे शिधापत्रिकांची पडताळणी करताना पात्र लाभार्थ्यांचे धान्य चुकीने बंद झाले नाही ना, याची प्रशासनाने गांभीर्याने तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच प्राधान्येतर कुटुंब प्रवर्गात वर्ग झालेल्या शिधापत्रिकांची कारणे स्पष्ट करावीत, पात्र आदिवासी व गरीब कुटुंबांची तातडीने फेरतपासणी करावी आणि नियमानुसार पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचे धान्य पुन्हा सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
धान्य बंद होण्यामागे शासनाचे निकष असतील, मात्र इगतपुरी तालुक्यातील गरीब व आदिवासी कुटुंबांवर अन्याय होऊ नये. पात्रतेची फेरतपासणी करून खऱ्या गरजू कुटुंबांना धान्याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करू. राजकीय पदे, आयकर भरणा, चारचाकी वाहने खरेदी, यावर शासनाने बंधने आहेत.
- ललित पाटील, गुण नियंत्रण अधिकारी पुरवठा विभाग इगतपुरी