धुळे ः टुडे १ साठी
--
गोमांस वाहतुकीवर दोन कारवाया
-
पाच लाखांचा मुद्देमाल जप्त; संशयिताला अटक
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ६ : जिल्ह्यात अवैध गोमांस वाहतुकीविरोधात पोलिसांनी रविवारी (ता. ४) दोन स्वतंत्र कारवाया केल्या. बोरविहीर (ता. धुळे) टोलनाका व मोहाडी शिवारातील नवीन सुरत- नागपूर बायपासजवळ केलेल्या कारवायांत पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. एका कारवाईत संशयिताला अटक झाली, तर दुसऱ्या प्रकरणातील चालक वाहन सोडून पसार झाला.
बोरविहीर टोलनाक्याजवळ रविवारी दुपारी पोलिसांनी कार (एमएच ०२ बीजी २४५६) अडवून तपासणी केली. त्यात २०० किलो गोमांस आढळले. एक लाखाची कार व ४० हजारांचे गोमांस, असा एक लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शकीब हुसेन जाकीर हुसेन (रा. आझादनगर, आसिफ चक्कीजवळ, धुळे) याला अटक केली. ललित खळगे यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
दुसरी कारवाई मोहाडी शिवारातील नवीन सुरत- नागपूर बायपासलगतच्या सर्व्हिस रोडवर सकाळी आठच्या सुमारास झाली. वाहन (एमएच ०१ एएल ८४३२) तपासले असता त्यातून विनापरवाना ३०० ते ४०० किलो गोमांसाची वाहतूक केली जात असल्याचे आढळले. तीन लाखांचे वाहन व ६० हजारांचे गोमांस, असा तीन लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच चालक वाहन सोडून पसार झाला. भूषण देवकाते यांच्या फिर्यादीवरून मोहाडी पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.