सांगवीत अवैध बिअरची वाहतूक रोखली; दोघांना अटक
---
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; पाच लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
वकवाड, ता. २ : मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणली जात असलेली बिअर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सांगवी (ता. शिरपूर) येथे जप्त केली. या कारवाईत एक लाख ४४ हजार रुपयांचे बिअरचे ४० बॉक्स आणि चारचाकी वाहन, असा एकूण पाच लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक देवीदास नेहूल यांना मध्य प्रदेशातून अवैध बिअरची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पथकाने शनिवारी (ता. ३१) रात्री दहाला मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ वरला-सांगवी रस्त्यावर सापळा रचला. संशयित वाहन (एमएच १४, एफसी १६९२) अडवून तपासणी केली असता, त्यात मध्य प्रदेश राज्यात निर्मित बिअरचे ५०० मिलिमीटर क्षमतेच्या एकूण ९६० बिअरच्या टीनचे ४० बॉक्स आढळले. त्यांची किंमत एक लाख ४४ हजार रुपये, तसेच चार लाख रुपयांचे वाहन, असा अंदाजे एकूण पाच लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहनचालक राहुल कैलास पनवार (रा. खुटवाडी, पटेल फलिया, वरला, जि. बडवानी, मध्य प्रदेश) आणि संजय सायमल पावरा (भिलटपाडा, पो. आंबे, ता. शिरपूर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
ही कारवाई निरीक्षक देवीदास नेहूल, दुय्यम निरीक्षक पी. पी. तायडे, जवान केतन जाधव, प्रशांत बोरसे व प्रतीकेश भामरे यांनी केली.