35178
धुळे : अवैध व्यवसायांविरोधात पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांना निवेदन देताना शिवसेना ‘उबाठा‘चे शिष्टमंडळ.
--
अवैध व्यवसायांचा ग्रामीण भागात सुळसुळाट
कारवाईसाठी शिवसेना ‘उबाठा‘चे पोलिस प्रशासनाला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १६ : जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश स्थितीचा फायदा घेत ग्रामीण भागात अवैध व्यवसाय आणि गुटखा तस्करीचा सुळसुळाट झाला आहे. या बेकायदेशीर प्रकारांमुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडत असून, हे अवैध व्यवसाय तातडीने बंद करावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडे सोमवारी (ता. १६) निवेदनाद्वारे केली. दरम्यान, ग्रामीण भागातील सर्व अवैध व्यवसाय तातडीने बंद करण्यात येतील, असे आश्वासन पोलिस अधीक्षकांनी दिल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण व वितरण समाधानकारक न राहिल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. शेतीचे उत्पन्न रोडावल्याने मुलामुलींचे शिक्षण, विवाह, आरोग्य आणि कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न शेतकरी कुटुंबांसमोर उभा ठाकला आहे. अशा बिकट स्थितीत शहरातील अवैध गुटखा तस्करीचे जाळे ग्रामीण भागात पसरले असून, अवैध जुगार, दारू निर्मिती व विक्री आणि अमली पदार्थांचा व्यापार जोरात सुरू आहे.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, निंबा मराठे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, हेमराज पाटील, संदीप सूर्यवंशी, आनंद जावडेकर, अण्णा फुलपगारे, शिवाजी शिरसाळे, शांताराम माळी, गजेंद्र पाटील, अजय चौधरी, कपिल लिंगायत, गुलाब धोबी आदी उपस्थित होते.
-
विशेष दलाल नेमले
वसुलीसाठी ग्रामीण भागात विशेष एजंट (दलाल) नेमण्यात आल्याची माहितीही निवेदनात देण्यात आली आहे. या अवैध व्यवसायांमुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी जात असून, आधीच आर्थिक संकटात असलेल्या ग्रामीण कुटुंबांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडत असल्याबद्दल पक्षाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. शहरात वचक निर्माण केल्यानंतर आता तालुक्यांच्या प्रमुख बाजारपेठा असलेल्या गावांमध्ये आणि ग्रामीण भागात सुरू असलेला हा गैरप्रकार थांबवून संबंधितांवर कठोर गुन्हे दाखल करावेत, अशी आक्रमक भूमिका या शिवसेनेने घेतली आहे.