धुळे : मुख्य अंकातील पानासाठी....अवतीभवती
--
‘अवैध धंद्यांचे
उच्चाटन करा’
धुळे : जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात भीम आर्मी जिल्हा समितीच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणाला ९ ऑक्टोबरला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. पोलिस प्रशासनाने कारवाई सुरू केल्याने संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, अवैध धंद्यांचे कायमस्वरूपी उच्चाटन होईपर्यंत ही कारवाई सुरू ठेवावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, हातगाडी व लोटगाडी व्यावसायिकांकडून महापालिकेमार्फत आकारण्यात येणारा दरमहा ७०० रुपयांचा पथकर कमी करून ३०० रुपये करावा, अन्यथा मनपाविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राहुल वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिला. जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या साक्री रोडवरील सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या वेळी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सागर चव्हाण उपस्थित होते. वाढती महागाई आणि दैनंदिन खर्च यामुळे छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक ताण येत आहे. त्यामुळे महापालिकेने पथकर कमी करून कष्टकरी व्यावसायिकांना दिलासा द्यावा, असे राहुल वाघ म्हणाले.
--
रानमळा शाळेत
एकपात्री प्रयोग
धुळे : येथील अभय युवा कल्याण केंद्र संचलित रानमळा (ता. धुळे) येथील एकनाथ महाराज हायस्कूलमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे नाट्यमय जीवन कथन’ हा एकपात्री प्रयोग उत्साहात पार पडला. विद्यालयाचे मुख्याध्यापक के. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनात उपक्रम झाला. पुण्याचे प्रा. श्रीरंग बोराडे यांनी आपल्या पहाडी आवाजात शिवरायांचा जन्म, स्वराज्य प्रतिज्ञा, अफझलखान वध, शाहिस्तेखानाची फजिती व गड- किल्ल्यांचा इतिहास जीवंत केला. त्यांच्या प्रभावी संवादफेकीने परिसर शिवमय झाला. या वेळी शिक्षक प्रल्हाद साळुंके, चंद्रकांत भदाणे, सचिन पवार, नित्यानंद पवार, संजय सूर्यवंशी यांनी प्रा. बोराडे यांच्या कलेचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शिवविचार अंगीकारण्याचे आवाहन केले.
--
नागाई माता मंदिरात
विविध धार्मिक कार्यक्रम
साक्री : तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोकले (ता. साक्री) येथील ६४ कुळांची कुलदेवता श्री नागाई माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. उत्सवादरम्यान दररोज पहाटे पाचला काकड आरती, पूजापाठ आणि धार्मिक विधी पार पडत असून, भाविकांना सपत्नीक आरतीचा मान दिला जात आहे. सायंकाळी मंदिराच्या प्रांगणात सलग नऊ दिवस रंगतदार गरबा- दांडिया उत्सवाच्या तालावर भाविक मातेचा जागर करत आहेत. उत्सव काळात अष्टमीला नवचंडी यज्ञ तर नवमीला १०८ कन्या पूजन आणि भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मठाधिपती महंत १००८ श्री प्रणवगिरी महाराज यांनी दिली.
--