न्याहळोद परिसरात अवैध व्यवसायांचे पेव
-
रेतीमाफियांची मुजोरी अन् व्यसनाधीनतेच्या विळख्यात तरुण पिढी
सकाळ वृत्तसेवा
न्याहळोद, ता. ७ : धुळे तालुक्यातील न्याहळोद व परिसरात रेतीची अवैध वाहतूक, जुगार (सट्टा-मटका- पत्ता) आणि हातभट्टीच्या दारू विक्रीसह अवैध व्यवसायांनी अक्षरशः डोके वर काढले आहे. या अनागोंदी कारभारामुळे गावातील शांत व सामाजिक वातावरण बिघडत चालले असून, तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थ व पालक वर्गातून संबंधित यंत्रणेने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी तीव्र मागणी होत आहे.
-
न्याहळोद आणि परिसरातील विविध मार्गांवरून दिवसाढवळ्या व प्रामुख्याने रात्रीच्या वेळी रेतीची चोरटी वाहतूक जोमात सुरू आहे. या बेकायदा वाहतुकीसाठी विनाक्रमांक (नंबर प्लेट नसलेली) वाहने वापरली जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. विशेष म्हणजे, रस्ता अडवणाऱ्या ग्रामस्थांवर अरेरावी करणे, धावून जाणे आणि मारहाणीची भाषा वापरणे अशा मुजोर घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. धुळे, कौठळ, तामसवाडी, कापडणे व बिलाडी या मार्गांवरून रेतीची वाहतूक करणाऱ्या या वाहनांमुळे रस्त्यांची चाळण होत असून, अपघातांचा धोका वाढला आहे. या प्रकाराची महसूल व पोलिसांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी आहे.
-
तरुण पिढी उद्ध्वस्त
गावातील काही ठराविक ठिकाणी सट्टा-पत्ता आणि जुगाराचे अड्डे सुरू आहेत. या व्यसनांमुळे अल्पवयीन व शाळकरी तरुणही याकडे आकर्षित होत आहेत. मेहनतीने शिक्षण घेऊन स्वतःचे आणि कुटुंबाचे भविष्य घडविण्याच्या वयातच तरुण पिढी नैराश्य आणि व्यसनांच्या आहारी जात असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. परिसरात दारूची सर्रास व खुलेआम विक्री सुरू असल्यामुळे अनेक संसार उघड्यावर पडण्याची वेळ आली आहे. तरुण मुले व्यसनाधीन होत असून, यामुळे कौटुंबिक कलह व सामाजिक डिस्टर्बन्स वाढत आहे. या अवैध धंद्यांच्या मुळाशी जाऊन कसून चौकशी करण्याची गरज आहे.
-
‘आशीर्वाद’ कोणाचा?
न्याहळोद व परिसरात फोफावलेले हे अवैध व्यवसाय नेमके कोणाच्या वरदहस्ताने व आश्रयाने सुरू आहेत? याबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष का होत आहे? असे अनेक प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत. या सर्व प्रकरणांची चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
-
१४-१
...चौकट...
१४-१
बडगा उगारण्याची मागणी
ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत पोलिस प्रशासन व महसूल विभागाने संयुक्त मोहीम उघडावी; विनानंबर प्लेटच्या वाहनांची तपासणी करावी, रेती वाहतूकदारांच्या परवान्यांची कागदपत्रे तपासावीत आणि अवैध जुगार-दारूविक्री अड्ड्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी न्याहळोद परिसरातील नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्षात ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.