अवैध मद्यविक्रीचे महिनाभरात २२२ गुन्हे दाखल

अवैध मद्यविक्रीचे महिनाभरात २२२ गुन्हे दाखल
Published on: 
अवैध मद्यविक्रीविरोधात मोहीम; महिनाभरात २२२ गुन्हे दाखल ‘उत्पादन शुल्क’ची धडक; १८७ संशयितांवर कारवाई; ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ५ : जिल्ह्यात अवैध मद्यविक्री, हातभट्टी दारू निर्मिती आणि मद्यतस्करीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ऑक्टोबर महिन्यात विशेष मोहीम राबविली. या मोहिमेत विभागाने धडक कारवाई करीत तब्बल २२२ गुन्हे दाखल केले असून, १८७ संशयितांवर कारवाई केली आहे. यात ४४ लाख ८१ हजार ८७३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच अवैध मद्यवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी आठ वाहनेही ताब्यात घेण्यात आली आहेत. सणासुदीच्या काळात अवैध मद्यविक्री आणि हातभट्टी दारू निर्मितीचे प्रकार वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य उत्पादन शुल्क, जळगाव विभागाने ऑक्टोबर २०२६ मध्ये विशेष तपासणी मोहीम हाती घेतली होती. जिल्ह्यातील विविध भागांत छापे टाकून अवैध मद्यनिर्मिती, साठवणूक, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणावर अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. यात सर्वाधिक ३ हजार ८५६ लिटर हातभट्टी दारूचा समावेश आहे. याशिवाय २८४ लिटर देशी दारू, २३८ लिटर ताडी, १८ लिटर विदेशी दारू आणि ४९ लिटर बिअर जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे, हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे तब्बल ८५ हजार ३४५ लिटर कच्चे रसायन (वॉश) घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. त्यामुळे अवैध दारू निर्मितीचे मोठे जाळे उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने विभागाला यश मिळाल्याचे दिसून येते. चौकट वाहनांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त अवैध मद्याची वाहतूक आणि विक्री करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आठ वाहनांवरही विभागाने कारवाई केली. विविध ठिकाणी केलेल्या छाप्यांमध्ये मद्यसाठा आणि इतर साहित्य असा एकूण ४४ लाख ८१ हजार ८७३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कोट जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि तस्करी करणाऱ्यांविरुद्ध आगामी काळातही विशेष मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. - प्रदीप पोटे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.