नर्सिंगसाठी बेकायदेशीर शुल्काची आकारणी
आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या तक्रारी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१ : खासगी शिक्षण संस्थांकडून नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना होणारा त्रास आणि त्यांच्याकडून आकारण्यात येणारे डोनेशन व अतिरिक्त शुल्काविषयी या विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांची भेट घेत तक्रार केली.
------------
शासकीय विश्रामगृहावर रविवारी (ता.१) विद्यार्थ्यांनी मंत्र्यांची भेट घेतली. या तक्रारींची दखल घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांची आर्थिक लूट खपवून घेतली जाणार नाही. दोषी संस्थांवर कडक कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा मंत्री डॉ. वुईके यांनी दिला. शासकीय नियमांनुसार आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळणे बंधनकारक असताना, विविध खासगी नर्सिंग महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांकडून ५० हजार, दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्काची सक्ती केली जाते. कल्याणकारी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. मंत्री डॉ. वुईके यांनी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त दिनकर पावरा, प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुंबे, आदिवासी महामोर्चाचे एन. डी. गावित, पांडुरंग गायकवाड, प्रशांत गावंडे, विवेक गावित, सोनू गायकवाड, हेमंत चौधरी, ललित चौधरी, सागर महाजन यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
…
विद्यार्थ्यांनो, थेट तक्रारी मांडा
प्रकल्प अधिकारी, अपर आयुक्त किंवा आयुक्त स्तरावर विद्यार्थ्यांच्या तक्रारींची वेळेत दखल घेतली जात नसेल, तर विद्यार्थ्यांनी थेट माझ्याकडे तक्रार करावी. विद्यार्थ्यांच्या हक्कांचे रक्षण करणे हे आदिवासी विकास विभागाचे आद्यकर्तव्य असून अधिकाऱ्यांनी अशा तक्रारींवर तातडीने आणि ठोस कार्यवाही करावी. अतिरिक्त शुल्क वसुली प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यापूर्वी कठोर भूमिका घेण्याचे निर्देश दिले होते, त्या अनुषंगानेच ही कारवाई अधिक गतिमान केली जाईल, असे मंत्री डॉ. वुईके यांनी स्पष्ट केले.
-------------