धुळे ः टुडे १ साठी
--
फोटो क्रमांक ः 31655
धुळे : एसटी आगार परिसरात कारवाईवेळी उपस्थित संयुक्त पथक.
--
खासगी प्रवासी वाहतुकीवर दंड
-
धुळे आगार परिसरात ‘एसटी’- ‘आरटीओ’ची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ७ : शहरातील धुळे एसटी आगार परिसरात एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर परिणाम करणाऱ्या अवैध खासगी प्रवासी वाहतुकीविरोधात एसटी महामंडळ व प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) संयुक्त पथकाने मंगळवारी कारवाई केली. नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी कारचालकाकडून नऊ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहनावरील पूर्वीचा दहा हजार रुपयांचा प्रलंबित दंड व वाहनकर भरण्याची प्रक्रियाही करण्यात आली.
-
धुळे आगारातून नाशिककडे जाणाऱ्या एसटी बसमधील प्रवाशांना नाशिक बायपास चौकातून खासगी वाहनांद्वारे वाहून नेले जात असल्याची माहिती एसटी प्रशासनाला मिळाली होती. नंतर एसटी महामंडळाने आरटीओशी समन्वय साधून संयुक्त तपासणी सुरू केली. एसटीच्या महसुलावर परिणाम करणाऱ्या तसेच, अधिकृत मार्गावरील प्रवाशांना खासगी वाहनांकडे वळविणाऱ्या वाहनांवर यापुढेही संयुक्त पथकाचे लक्ष राहणार आहे.
-
खासगी वाहन तपासणी
कारवाईदरम्यान संशयित खासगी कारची तपासणी केली असता त्यातून प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे आढळले. प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक परवाना नसल्याचे तसेच कायदेशीर अटींचे पालन झाले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मोटार वाहन कायद्यानुसार वाहनचालकावर कारवाई करण्यात आली. विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली. विभागीय वाहतूक अधीक्षक सुनील महाले यांच्यासह आरटीओ विभागातील अधिकारी संयुक्त पथकात होते.
-
नियमित कारवाई होणार
एसटीच्या अधिकृत मार्गांवरील प्रवाशांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर यापुढेही नियमित कारवाई केली जाणार आहे. परवान्याशिवाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन एसटी व्यवस्थापनाने केले आहे. धुळे आगार, नाशिक बायपास, प्रमुख चौक तसेच, एसटी बसथांब्यांच्या परिसरात तपासणी सुरू राहणार असून, नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडासह पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
-