NSK26H34584
जळगाव : पोलिसांनी जप्त केलेले डंपर व ट्रॅक्टर.
---
अवैध वाळू वाहतुकदारांवर धडक कारवाई
जळगाव, नशिराबादसह ७ गुन्हे दाखल; ५० लाखांचा ऐवज जप्त
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ५ : पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनात बुधवारी (ता. ४) भडगाव, नशिराबाद आणि जळगाव तालुका पोलिसांच्या पथकांनी अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने ताब्यात घेतली. संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.
भडगाव, नशिराबाद आणि जळगाव तालुका पोलिस ठाण्यांच्या हद्दीत वाळू वाहतूक करणारी वाहने ताब्यात घेण्यात आली. सात जणांविरुद्ध कारवाई केली असून, तीन डंपर, दोन ट्रॅक्टर आणि वाळूसह एकूण ५० लाख ९० हजार २६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भडगाव तालुक्यातील वलवाडी बुद्रुक परिसरात दोघांकडून १२ ब्रास वाळू व दोन डंपर, असा एकूण ४१ लाख ३१ हजार ५६६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नशिराबादजवळील पुलावर दोघांकडून तीन ब्रास वाळू व डंपर, असा तीन हजार १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
फुफनगरी नदीपात्रातून खेडी खुर्द गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन ट्रॅक्टर आणि वाळू, असा एकूण सहा लाख ४८ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तीन संशयितांवर कारवाई करण्यात आली.