अवैध वाळूचे दोन डंपर ताब्यात
तालुक्यात एकावर गुन्हा, दुसरा डंपर पळविला
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाळधी ते तरसोद बाह्यवळण मार्गावर (बायपास) ममुराबाद शिवारात विनापरवाना गौण खनिजाची वाहतूक करणारा डंपर पोलिसांनी पकडला. दुसऱ्या एका घटनेत एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून महसूल विभागाने ताब्यात घेतला वाळूचा डंपर संशयितांनी पळवून लावला आहे. दोन्ही घटनांमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पाळधी ते तरसोद बायपास रोड, ममराबाद ओव्हरब्रिजवर मंगळवारी (ता.१३) पहाटे अडीचला पोलिस नाईक नवल हटकर यांच्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे पांढऱ्या रंगाचा डंपर (एमएच २१, एक्स ३०८९) अवैधरित्या वाळू वाहतूक करताना मिळून आले असून, जप्त मुद्देमालाचा पंचनामा करुन तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक प्रकाश चिंचोरे तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत...
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत महसूल व दुर्देव क्षेत्रासमोरील मोकळ्या आवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर मंगळवारी (ता.१३) मध्यरात्री सव्वाला कारवाई करण्यात आली. मंडळ अधिकारी शशिकांत मोरे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलकरण्यात आला. त्यानंतर सहा ब्रास वाळूसह डंपर जप्त करण्यात आला. पोलिस या डंपरचा पंचनामा करत असताना, डंपरचालकाने अचानक डंपर सुरू करुन तेथून पळ काढला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस नाईक चंद्रकांत पाटील तपास करत आहेत.