पान तीन
---------------------
देवघटच्या पाझर तलावातील
अवैध पाणी उपसा थांबणार
--------
लघुपाटबंधारे उपविभागाचे महावितरणला पत्र
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव शहर, ता.६: माळमाथा भागातील देवघट (ता. मालेगाव) येथील पाझर तलावातून विद्युत मोटारींच्या साहाय्याने सुरू अवैध व बेकायदेशीर पाणी उपसा सुरू आहे. सदर उपशसावर तातडीने कारवाई करण्यात यावी, यासाठी जिल्हा परिषद लघुपाटबंधारे उपविभागाने वीज वितरण कंपनीला उपायोजना करण्याची सुचना केली आहे. यासंदर्भात उपअभियंत्यांनी उपकार्यकारी अभियंता यांना लेखी पत्र पाठवून पाझर तलाव परिसरातील बेकायदेशीर वीजजोडण्या तातडीने खंडित करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अशासकीय सदस्य प्रशांत देसले यांनी लघुपाटबंधारे विभागाकडे तक्रार अर्ज दाखल करत देवघट येथील सार्वजनिक जलसाठ्यातून (पाझर तलाव) काही व्यक्ती अनधिकृतपणे विद्युत मोटारी लावून पाण्याचा उपसा करत असल्याचे नमूद केले होते. या पार्श्वभूमीवर महावितरण विभागाने पाझर तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी करावी. अवैध पाणी उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या विद्युत मोटारी व संबंधित वीजजोडण्यांवर कारवाई करून त्यांचा वीजपुरवठा तत्काळ खंडित करावा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.
श्री.देसले यांनी केलेल्या तक्रारीची दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लघुपाटबंधारे उपविभागाच्या उपअभियंत्यांनी गंभीर दखल घेत महावितरण प्रशासनाला पत्र पाठवले असून कारवाईचे निर्देश दिले आहेत. पाझर तलावातील पाणीसाठा हा परिसरातील भूजल पुनर्भरण, विहिरींची पाणी पातळी वाढवणे व स्थानिक नागरिकांची पाण्याची उपलब्धता कायम राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तलावातून असाच अनधिकृत उपसा सुरू राहिल्यास उपलब्ध साठा झपाट्याने कमी होऊन येत्या काळात शेतकरी व ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागेल याकडे संबंधितांचे लक्ष वेधले आहे.