धुळे टुडे १ साठी मेन...
---
फोटो- NSK26H32932, NSK26H32933
अक्कलपाडा प्रकल्प : अवैध पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारीच्या जोडण्या खंडीत करुन साहित्य जप्त करतांना पाटबंधारे, महावितरणचे पथक.
---
अवैध पाणी उपशावर पाटबंधारेची धडक कारवाई
---
अक्कलपाडा व मालनगाव मध्यम प्रकल्पांतील विद्युत मोटारींच्या जोडण्या खंडीत
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १८ : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाच्या शासन निर्णयानुसार पाटबंधारे उपविभाग, साक्री यांच्या कार्यक्षेत्रातील अक्कलपाडा मध्यम प्रकल्प व मालनगाव मध्यम प्रकल्प येथे अवैधरीत्या पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारींच्या जोडण्या खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली.
पाण्याचा अनधिकृत उपसा रोखून उपलब्ध जलसाठ्याचे संरक्षण करणे तसेच पाणी वापराचे नियोजन प्रभावीपणे राबविणे हा या कारवाईमागील प्रमुख उद्देश आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसाठ्याचा विनियोग नियमानुसार व्हावा आणि अनधिकृत पाणी उपशामुळे इतर पाणी वापरकर्त्यांच्या हक्कांवर परिणाम होऊ नये, यासाठी पाटबंधारे विभागाने ही मोहीम हाती घेतली आहे.
नोटिसांनंतर कारवाई
अक्कलपाडा व मालनगाव मध्यम प्रकल्प परिसरात अवैधरीत्या पाणी उपसा करण्यासाठी विद्युत मोटारींचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधितांना नियमानुसार नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. नोटिसांनंतर पाटबंधारे विभागाने वीज वितरण विभागाला सोबत घेऊन प्रत्यक्ष कारवाई केली. या कारवाईदरम्यान अवैध पाणी उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या विद्युत मोटारींच्या जोडण्या खंडित करण्यात आल्या. धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र अग्रवाल यांच्या आदेशान्वये आणि उपविभागीय अधिकारी अ. ज. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत पाटबंधारे विभागाच्या पथकातील शाखा अभियंता ऋषी भोई, कनिष्ठ अभियंता मयुरी सूर्यवंशी, कालवा निरीक्षक ललिता सोनवणे, मोजणीदार रोशन भदाणे, कालवा चौकीदार मनोहर बेडसे, वरिष्ठ तंत्रज्ञ प्रकाश अहिरे, पंकज भदाणे यांचा सहभाग होता. वीज वितरण विभागाच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.
यापुढेही नियमित तपासणी
अवैध पाणी उपशाविरोधातील ही कारवाई केवळ एकदाच न करता यापुढेही वेळोवेळी सुरू ठेवण्यात येणार आहे. पाटबंधारे विभाग आणि वीज वितरण विभागाचे संयुक्त पथक प्रकल्प परिसरात तपासणी करून अनधिकृत पाणी उपसा आढळल्यास नियमानुसार पुढील कारवाई करणार आहे.
पाणी जपून वापरा
पाणी हा मर्यादित नैसर्गिक स्रोत असून त्याचा अनधिकृत व अनियंत्रित वापर झाल्यास भविष्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू शकते. त्यामुळे शेतकरी, नागरिक आणि सर्व पाणी वापरकर्त्यांनी पाण्याचा वापर जबाबदारीने करावा, अवैधरीत्या पाणी उपसा करू नये आणि शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
---