सटाणा : नामपूर ते बेहेड रस्ता बनला मृत्युचा सापळा | latest nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यांची दुरावस्था

नामपूर ते बेहेड रस्ता बनला मृत्युचा सापळा

सटाणा (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातील नामपूर- चिराई- राहुड- बेहेड या साक्री तालुक्याला जोडणाऱ्‍या सर्वात जवळच्या आणि महत्वाच्या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्‍न पडावा, अशी या रस्त्याची अवस्था झालेली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. या रस्त्यावर अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत असून, अनेक निष्पाप नागरिकांचा अपघातात बळी गेल्याने हा रस्ता आता मृत्युचा सापळा बनला आहे. या रस्त्याच्या कामाकडे लोकप्रतिनिधींसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष असून येत्या पावसाळ्याच्या आत रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी वाहनधारक आणि परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

बागलाण आणि साक्री या दोन तालुक्यांना जोडणाऱ्‍या तसेच, मालेगाव जाण्यासाठी सोईस्कर असलेल्या नामपूर परिसरातील नामपूर- चिराई- राहुड- बेहेड हा मुख्य रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे जवळपास ३५ ते ४० टन क्षमतेचे वाळू भरलेल्या शेकडो डंपरची मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस चोरटी वाहतूक सुरू असल्याने या अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची अशी दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याने सार्वजनिक बांधकाम विभागासह तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी अनेकवेळा ये- जा करतात. मात्र, रस्त्याची दुरुस्ती आणि वाळूच्या चोरट्या वाहतुकीकडे त्यांच्याकडून सोईस्करपणे डोळेझाक होत असते. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या रस्त्यावर खड्ड्याचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरले असून ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यातून वाहन चालविणे अवघड झाले आहे. वाहनचालक, शेतकरी, पादचारी यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकदा अपघातांना निमंत्रण मिळते. त्यामुळे अनेक वाहनधारकांना नाहक जीव गमवावा लागला असून, अनेकांना अपंगत्वही आले आहे. हा रस्ता गेल्या काही वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या विरोधात वाहनधारक व स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

आज परिस्थिती पाहता खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी झाली आहे. खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने अपघात घडत आहे. वाहने नादुरुस्त होत असून, वाहून चालकांना त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तरी संबंधितांनी याकडे तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे. या परिसरात द्राक्ष, टोमॅटो, कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात आहे. परिसरातील गावांना नामपूर बाजार समितीमध्ये शेतीमाल घेवून जाण्यासाठी जवळचा व महत्वाचा मार्ग आहे. मात्र, रस्ता खराब असल्याने शेतकऱ्‍यांना वेळेमध्ये आपला शेतमाल घेऊन जाणे अशक्य होत आहे.

भाविकांची गैरसोय

चिराई (ता. बागलाण) येथील चिराई माता आणि म्हसदी (ता. साक्री) येथील श्री धनदाई माता या आदिशक्ती अनेक कुटुंबियांचे कुलदैवत आहेत. ही दोन्ही प्रख्यात देवस्थाने याच मार्गावर असल्याने वर्षभरात देवीचे दर्शन आणि यात्रोत्सवासाठी महाराष्ट्रासह परराज्यातील अनेक भाविक या रस्त्यावरून देवीच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता खराब असल्याने भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

हेही वाचा: Nashik : अवैध हातभट्यांवर पोलिसांकडून धडक कारवाई

"नामपूर- चिराई- राहुड- बेहेड या रस्त्यावर गेल्या दोन ते तीन वर्षांपासून खड्ड्याचे मोठ्या प्रमाणावर साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित दखल घेवून रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करावा."

- हर्षल बागूल, वाहनचालक

हेही वाचा: गॅस भाववाढीचा भडका अन चुलीवर तडका

Web Title: In Baglan Taluka Nearest And Most Important Roads Are In Very Bad Condition In Nashik Distric

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top