esakal | नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे ४६ बळी; पाच हजार ३४ रुग्ण बरे

बोलून बातमी शोधा

Corona
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे ४६ बळी; पाच हजार ३४ रुग्ण बरे
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूंची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी (ता.२४) जिल्ह्यात ४५ बाधितांचा कोरोनाने बळी घेतला. पाच हजार ९१८ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. दिवसभरात पाच हजार ३४ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. यातून जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांची संख्या ४७ हजार ७०४ वर पोचली आहे.

जिल्ह्यातील ४६ मृतांमध्ये सर्वाधिक २८ मृत्‍यू नाशिक ग्रामीणमधील आहेत. यात चांदवड तालुक्‍यातील नऊ बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. निफाड तालुक्‍यातील चार, येवल्‍यातील तिघांचा मृत्‍यू झाला. नांदगावसह सुरगाणा, सिन्नर, बागलाण तालुक्‍यांतील प्रत्‍येकी दोन, तर दिंडोरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ तालुक्‍यांतील प्रत्‍येकी एकाचा कोरोनाने मृत्‍यू झाला. नाशिक महापालिका क्षेत्रातील १७, तर नाशिकला उपचार घेत असलेल्‍या जळगावच्‍या बाधिताचा मृतांमध्ये समावेश आहे. दिवसभरात आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील तीन हजार ४१३, नाशिक ग्रामीणमधील दोन हजार ३५०, मालेगाव महापालिका क्षेत्रातील ७५, तर जिल्‍हाबाहेरील ८० रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत.

जिल्ह्यात सायंकाळी उशिरापर्यंत सहा हजार ५३४ अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीणमधील सर्वाधिक चार हजार ४७० रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. नाशिक शहरातील एक हजार ७७३, मालेगावचे २९१ अहवाल प्रलंबित होते. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात सहा हजार ३३० रुग्‍ण दिवसभरात दाखल झाले. यापैकी पाच हजार ९४२ अहवाल नाशिक महापालिका हद्दीतील होते. जिल्‍हा रुग्‍णालयात आठ, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात २५ रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील ३१२, मालेगाव महापालिका क्षेत्रातील ४३ रुग्‍णांचा समावेश आहे.