esakal | रेशीम उत्पादनातून मिळाले भरघोस उत्पन्न; 6 लाख ५० हजारांपेक्षा जास्त उत्पन्न
sakal

बोलून बातमी शोधा

silk production

रेशीम उत्पादनातून मिळाले भरघोस उत्पन्न; 6 लाख ५० हजारांपेक्षा जास्त उत्पन्न

sakal_logo
By
विजय पगार

इगतपुरी (जि.नाशिक) : रेशीम उद्योगाच्या माध्यमातून तालुक्यातील जाधववाडी येथील नाना ऊर्फ सखाहरी जाधव या शेतकऱ्याने (farmer) यशस्वी होऊन दाखवले. त्यांनी शासनाचे सहकार्य व सकाळ- सायंकाळी दोन तास काम करून एक एकरातील तुती लागवड केली. या रेशीम शेतीतून त्यांनी सहा लाख ५० हजारांपेक्षा जास्त उत्पन्न घेतले आहे.(income from silk production nashik marathi news)

हेही वाचा: बिटको हॉस्पीटलची तोडफोड करण्याची वेळ पतीवर का आली? भाजपा नगरसेविका म्हणतात...

रेशीम उत्पादनातून मिळाले भरघोस उत्पन्न

जिल्ह्यात रेशीम उद्योगातील तज्ज्ञ शेतकरी म्हणून नाना जाधव प्रसिद्ध असून, ते महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना नियमित मार्गदर्शनही करू लागले आहेत. स्थानिक कारखान्यात नोकरी, गावचे सरपंचपद, दुग्धव्यवसाय, पारंपरिक शेती आदींमधून आपल्या कुटुंबाला पुढे नेण्यासाठी जाधव यांनी अविरत प्रयत्न केले. तथापि त्यांना त्यात यश मिळाले नाही. यामुळे उद्विग्नता वाढून वाईट विचार मनात येऊ लागले. अशा निर्णायक काळात त्यांना तुती लागवड आणि रेशीम उद्योगाबाबत माहिती मिळाली. जिल्हा रेशीम कार्यालयातून विविधांगी माहिती घेऊन त्यांनी रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला. शासनाचे तांत्रिक सहाय्य घेऊन त्यांनी एक एकर क्षेत्रात रेशीम शेती उभी केली. योजनेतून सलग तीन वर्षे शासनाकडून योजनेचा लाभ त्यांना मिळणार आहे. दुसऱ्याच वर्षी त्यांची रेशीम कर्नाटक आणि नाशिकच्या बाजारपेठेत पोचली. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण रेशीम असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. या वर्षी त्यांनी निव्वळ नफा सहा लाख ५० हजारांपेक्षा जास्त कमावला. भांडवली खर्चाचा विचार केल्यास फक्त दहा हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च झालेला नाही. त्यांच्या सोबतीला भाचा धनंजय राव, पत्नी तुळसाबाई, आई जनाबाई मदत करतात. जिल्हा रेशीम अधिकारी सी. के. बडगुजर, सारंग सोरते, श्री. जोशी, तहसीलदार परमेश्वर कासुळे, तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

हेही वाचा: Tauktae : सुरगाण्यात शाळेचे उडाले पत्रे; गुलाबी गावातील फळबागांचे नुकसान

विविध संस्थांकडून पुरस्कार

रेशीम उद्योगाचा व्यवसाय यशस्वी झाल्यामुळे आता आयुष्यभर एवढी चांगली असणारी रेशीम शेती सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण कुटुंब या उद्योगात समरस आणि समाधानी झाल्याचा आनंद कुठेही मिळणार नसल्याचे ते सांगतात. जिल्हाभरातील विविध भागांतील शेतकऱ्यांना नाना जाधव आणि रेशीम हे समीकरण माहीत आहे. त्यामुळे नाना जाधव यांच्याकडून शेतकऱ्यांना रेशीम शेतीबाबत नेहमीच मार्गदर्शन केले जाते. यामुळे विविध संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरविले आहे.

loading image