esakal | द्राक्षाने मारले, डांगराने तारले! कमी भांडवलमध्ये मिळाले लाखोंचे उत्पन्न
sakal

बोलून बातमी शोधा

Income-of-lakhs-grape-grower

द्राक्षाने मारले, डांगराने तारले! मिळाले लाखोंचे उत्पन्न

sakal_logo
By
संदीप मोगल

लखमापूर (जि.नाशिक) : अनेक वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक आपत्तीला (natural calamities) तोंड देत आहे. प्रत्येक द्राक्ष हंगामात शेतकरी (farmer) कर्जबाजारी होताना दिसत आहे. हवामान बदलाचा विचार करून दिंडोरी तालुक्यातील करंजवण येथील प्रयोगशील शेतकरी विलास जाधव यांनी आपल्या दोन एकर द्राक्षबागेला कुऱ्हाड लावली. आपण कमी खर्चात परवडणारी शेती केली पाहिजे, असा विचार मनात धरून डांगर लागवडीला सुरवात केली. (Income-of-lakhs-grape-grower-at-Karanjavan-nashik-marathi-news)

द्राक्षाने मारले, डांगराने तारले

द्राक्षबाग तोडल्यानंतर शेताची कोणतीही मशागत न करता द्राक्षवेलीचे खुटके ट्रॅक्टरने काढून घेतले. त्याच द्राक्षवेलीच्या ठिकाणी डांगराचे बियाणे टोचण्यात आले. बागेला ठिबक सिंचन असल्याने तो खर्च करण्याची वेळ आली नाही. साधारणपणे दोन एकरांत दोन हजार डांगर बियाण्याची टोकन पद्धतीने लागवड करण्यात आली. दोन सरीमधील अंतर ९ बाय ६ असल्याने डांगर वेल जमिनीवर पसरण्यास कुठलाही अडथळा निर्माण झाला नाही. यामुळे वेलीची वाढ अतिशय चांगली झाली.

अल्प भांडवलामध्ये साडेतीन लाखांचे उत्पन्न

द्राक्षबागेला प्रत्येक वर्षी टाकलेले शेणखत, जैविक व रासायनिक खतांचा डांगरवेलीला मोठा फायदा झाला. वेलीला चांगला बहर येऊन ८० दिवसांत डांगर तोडणीसाठी तयार झाले. एका वेलीवर साधारणतः ७० ते ८० किलो डांगराचा माल मिळाला. नाशिक बाजारात सध्या ३५ ते ४० टन मालाची हातविक्री स्वतः शेतकरी करीत आहेत. आठ ते दहा रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. डांगर तोडणीनंतर दोन ते तीन महिने साठवून ठेवता येतो. त्यामुळे बाजारभावानुसार मालाची विक्री करता येते. विलास जाधव यांनी अतिशय कमी खर्चात हे पीक घेतले आहे. त्यांनी बाराशे रुपयांचे बियाणे विकत घेतले. पिकांवर कुठल्याही रासायनिक औषधाची फवारणी केली नाही. अल्प भांडवलामध्ये त्यांना साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

सध्याच्या परिस्थितीत हमीभाव नसल्याने शेतीव्यवसाय धोक्यात आला आहे. यासाठी शेतकरी वर्गाने कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन काढता येईल, अशा पिकांची लागवड करणे आवश्यक आहे. हवामान बदलांवर आधारित पिकांची पेरणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. -विलास जाधव, शेतकरी, करंजवण

हेही वाचा: वऱ्हाडी मंडळींना लग्न पडले महागात! 5 हजारांचा बसला फटका

हेही वाचा: नाशिककरांना जोरदार पावसासाठी २१ दिवसांची प्रतीक्षा

loading image