बियाणे निर्यातीतून १,४५५ कोटींचे परकीय चलन!
---
पाच वर्षांत निर्यातमूल्यात ७३ टक्के वाढ; हवामानातील अनिश्चितता, गुणवत्ता आणि पायाभूत सुविधांचे आव्हान
अरुण खांगळ : सकाळ वृत्तसेवा
लासलगाव, ता. ९ : फळे आणि भाजीपाला बियाण्यांची निर्यात भारतासाठी परकीय चलनाचे महत्त्वाचे साधन ठरत आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात भारताने १८ हजार १८५ टन बियाण्यांची निर्यात करून एक हजार ४५५ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळविले. २०२१-२२ मधील ८४३ कोटी रुपयांच्या तुलनेत निर्यातमूल्यात सुमारे ७३ टक्के वाढ झाली आहे. मात्र, बदलते हवामान, उत्पादनाची गुणवत्ता आणि निर्यातीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा ही या क्षेत्रासमोरील प्रमुख आव्हाने आहेत.
भारतात विविध हवामान परिस्थितींमुळे फळे, भाजीपाला आणि विविध पिकांच्या बियाण्यांचे उत्पादन होते. नेदरलँड, अमेरिका, बांगलादेश, थायलंड, स्पेन, जपान, फ्रान्स आणि केनियासह अनेक देशांमध्ये भारतीय बियाण्यांना बाजारपेठ उपलब्ध आहे. दर्जेदार वाण आणि उत्पादनक्षमतेमुळे या क्षेत्राला निर्यातवाढीची संधी आहे.
निर्यातमूल्यात सातत्याने वाढ
उपलब्ध आकडेवारीनुसार २०२१-२२ मध्ये २१ हजार ५२ टन बियाण्यांतून ८४३ कोटी रुपये मिळाले. २०२२-२३ मध्ये २१ हजार ४४५ टनांसाठी ९४७ कोटी, २०२३-२४ मध्ये १७ हजार ७११ टनांसाठी एक हजार ९९ कोटी आणि २०२४-२५ मध्ये २२ हजार ७९८ टनांसाठी एक हजार ३४६ कोटी रुपयांचे निर्यातमूल्य नोंदले गेले. २०२५-२६ मध्ये निर्यात प्रमाण घटून १८ हजार १८५ टन झाले, तरी निर्यातमूल्य एक हजार ४५५ कोटी रुपयांवर पोहोचले. यावरून निर्यातीत उच्च मूल्याच्या बियाण्यांचे महत्त्व अधोरेखित होते.
हवामान बदलाचा उत्पादनाला फटका?
पावसाचे असमान वितरण, दुष्काळ, अतिवृष्टी आणि तापमानातील चढ-उतार यांचा बियाणे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास उत्पादनाचे क्षेत्र, गुणवत्ता आणि उपलब्धता घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्यातीसाठी आवश्यक अतिरिक्त साठ्यावर दबाव येऊ शकतो. मात्र, निर्यातीवर होणारा प्रत्यक्ष परिणाम हा पीकनिहाय उत्पादन, सिंचन सुविधा, करारशेती आणि कंपन्यांकडील साठ्यावर अवलंबून राहील. सुधारित वाण, ठिबक सिंचन, संरक्षित शेती आणि शास्त्रीय पीक व्यवस्थापनामुळे हवामानातील अनिश्चिततेचा परिणाम कमी करण्यास मदत होऊ शकते.
पायाभूत सुविधा आणि गुणवत्ता महत्त्वाची
जागतिक बाजारपेठेत टिकण्यासाठी बियाण्यांची जनुकीय शुद्धता, उगवणक्षमता, रोगमुक्तता आणि आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानके पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी आधुनिक प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे आणि प्रमाणपत्र सुविधांचा विस्तार गरजेचा आहे.
फळे-भाजीपाला निर्यातीसाठी कोल्ड चेन, पॅकहाउस, क्वारंटाईन सुविधा, बंदरे आणि विमानतळांशी जोडलेली जलद वाहतूक व्यवस्था आवश्यक आहे. अपुऱ्या काढणीनंतरच्या व्यवस्थापनामुळे होणारे नुकसान कमी केल्यास निर्यातीची गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता वाढू शकते.
शेतकऱ्यांना निर्यातीचा थेट लाभ हवा
निर्यातवाढीचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या, बियाणे उत्पादक आणि निर्यातदार यांच्यात समन्वय वाढविणे आवश्यक आहे. निर्यातक्षम वाण, गुणवत्ता मानके, पॅकिंग, प्रमाणपत्रे आणि परदेशातील मागणी याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. स्थिर निर्यात धोरण, सुलभ कर्ज- विमा सुविधा आणि स्थानिक पातळीवर प्रक्रिया व साठवणूक व्यवस्था उभारल्यास या क्षेत्राला चालना मिळू शकते. भारतीय बियाण्यांच्या निर्यातीतील वाढीची गती टिकविण्यासाठी उच्च गुणवत्ता, तंत्रज्ञानाधारित उत्पादन आणि सक्षम पायाभूत सुविधा यांवर भर देणे आवश्यक आहे. त्यातून परकीय चलनवाढीबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीलाही हातभार लागू शकतो.