Nashik News : केंद्रीय राखीव सुरक्षा बलातील जवानाची दुचाकी गोदेच्या कालव्यात कोसळली; 14 तासांपासून जवान बेपत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Gite

Nashik News : केंद्रीय राखीव सुरक्षा बलातील जवानाची दुचाकी गोदेच्या कालव्यात कोसळली; 14 तासांपासून जवान बेपत्ता

सिन्नर : तालुक्यातील मेंढी येथील केंद्रीय राखीव सुरक्षा बलातील जवान गणेश सुकदेव गिते (३६) हे पत्नी व मुलांसह शिर्डी येथून घरी परतत असताना चोंढी शिवारात गुरुवारी (ता. ९) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी गोदावरी उजव्या कालव्यात पडली.

यावेळी जवानासह स्थानिक नागरिकांनी त्यांची पत्नी व मुलांना वाचविले. मात्र जवान पाटाच्या पाण्यात वाहून गेला. गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जवान पडल्याने तब्बल 14 तास उलटूनही केंद्रीय राखीव जवानाची शोध मोहीम सुरू असूनही अजून जवान मिळून आलेला नाही.

मेंढी येथील शेतकरी सुकदेव रतन गिते यांचा मुलगा गणेश सुकदेव गिते हा केंद्रीय राखीव सुरक्षा बलात पंतप्रधानांच्या विशेष पथकात तैनात आहे. २४ फेब्रुवारी रोजी तो सुटीवर आला होता. गुरुवारी गणेश हापत्नी रुपाली गणेश गिते (३०) मुलगी कस्तुरी (७) व मुलगा अभिराज (दीड वर्षे) यांच्यासह शिर्डी येथे दर्शनासाठी मोटारसायकलने गेला होता.

शिर्डीहून मोटारसायकलने परतत असताना नांदूरमध्यमेश्वर धरणातून गेलेल्या उजव्या कालव्याच्या बाजूने चोंढी शिवारात असलेल्या घराकडे जात असताना सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरापासून ३०० मीटर अंतरावर मेंढी-ब्राह्मणवाडे रस्त्यावर तवंग परिसरात गणेशचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने मोटारसायकल उजव्या कालव्यात पडली.

कालव्याला आवर्तन सुटलेले असल्याने मोटारसायकल पडण्याचा आवाज होताच जवळच असलेल्या नितीन गिते याने क्षणाचा विलंबही न करता धाव घेतली. पाण्यात पडल्यानंतर गणेश व नितीनने गणेशची पत्नी रूपाली, मुलगी कस्तुरी व मुलगा अभिराज यांना बाहेर काढले, मात्र पाण्याच्या प्रवाहात गणेश वाहून गेला. घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत गणेशचा शोध सुरू केला.

गणेश हा केंद्रीय राखीव सुरक्षा बलातील जवान नुकत्याच सुट्टीवर आपल्या गावी मेंढी येथे आलेला होता. आपल्या कुटुंबासह शिर्डी इथे दर्शनासाठी गेला असता सुमारे सहा वाजेच्या दरम्यान चोंडी शिवारातून आपल्या घराकडे जात असताना घर सुमारे अर्धा किलोमीटर असतानाच अचानक गणेशचा गाडीवरचा तोल जाऊन गाडीही गोदावरीच्या उजव्या कालव्यात पडली.

गाडीचा मोठा आवाज होताच शेजारीच राहत असलेल्या नितीन बाहेर येतात त्यांनी हा प्रसंग बघता क्षणाचा विलंबही न करता त्याने तलावात उडी मारून गणेशची पत्नी मुलगा व मुलीला बाहेर काढले पण पाण्याच्या प्रवाहात गणेश हा पुढे वाहून गेल्याने सर्व ग्रामस्थ व इंडियाच्या टीमने शोध घेत आहेत, मात्र गणेश हा जवान मिळून आला नाही.

अजूनही शोध मोहीम सुरू आहे. मुसळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश पवार हवालदार हिरामण बागुल विजयसिंह ठाकूर पोलीस नाईक धनाजी जाधव विनोद जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत गणेशचा शोध सुरू ठेवला होता. तसेच एन डी आर टीमही घटनास्थळी दाखल झालेली होती शोध मोहीम सुरू आहेत.