जगात भारतीय मक्याला सुवर्णकाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Golden age of Indian 24 lakh tons exported maize in world nashik

जगात भारतीय मक्याला सुवर्णकाळ

नाशिक : रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे आशिया देशात भारतीय मक्याला मागणी वाढली आहे. विशेष म्हणजे, जागतिक बाजारात अमेरिकापेक्षा स्वस्त असल्याने भारतीय मक्याला सध्या सुवर्णकाळ आहे. आगामी सहा महिन्यात २४ लाख टन मक्याच्या निर्यातीचा अंदाज बाजारपेठीय अभ्यासकांनी वर्तवला आहे.आतापासून ऑक्टोबरपर्यंत ११० ते १२० लाख टन मक्याची देशातंर्गत गरज असून रब्बीतून १०० लाख टन मक्याचे उत्पादन अपेक्षित आहे. तरीही ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत देशातंर्गत मक्याची चणचण भासण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देशात खरिपाच्या ८२ लाख हेक्टर क्षेत्रातून २०५ लाख, रब्बीच्या २० लाख हेक्टरमधून १०० लाख, तर उन्हाळी साडेआठ हेक्टरमधून ३२ लाख टन असे एकूण तीन लाख ३७ हजार टन मक्याचे उत्पादन अपेक्षित आहे. त्यापैकी ५५ टक्के मक्याची आवश्‍यकता कुक्कुटपालन उद्योगासाठी भासणार आहे.

व्हिएतनामध्ये मोठी निर्यात

भारतीय मक्याची निर्यात बांगलादेश आणि नेपाळमध्ये मोठ्याप्रमाणात होते. यंदा पहिल्यांदा व्हिएतनाममध्ये मक्याची निर्यात मोठी झाली आहे. याशिवाय भारतीय मक्याचे ग्राहक मलेशिया, म्यानमार, श्रीलंका, भूतान, तैवान, ओमानमध्ये आहेत. गेल्यावर्षी सर्वसाधारपणे चौदाशे ते पंधराशे रुपये क्विंटल भावाने मका विकला गेला होता. आता दोन हजार १०० ते २ हजार ४०० रुपये क्विंटल भावाने कुक्कुटपालन उद्योगाला मका खरेदी करावा लागत आहे.

आशिया देशांमध्ये ग्राहक असलेल्या युक्रेनचा जगातील निर्यातीचा हिस्सा १७ टक्क्यांपर्यंत आहे. युद्धात युक्रेनमधील बंदरे उद्ध्वस्त झालेली असताना नवीन मक्याच्या लागवडीचा प्रश्‍न तयार झाला आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय मक्याची प्रामुख्याने आशिया देशांमध्ये निर्यातीचा आलेख उंचावत राहील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भारतातील स्थिती

  • हंगामाला सुरवात झाल्यानंतर पहिल्या दहा महिन्यांत निर्यातीत २८ टक्क्यांनी वाढ

  • ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत २२ लाख टन मक्याची निर्यात

  • गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत निर्यात सहा पटीने वाढल्याचे बाजारपेठीय अभ्यासकांचे म्हणणे

भारतीय मक्याचा दर (क्विंटलचा रुपयांत दर)

२,५०० - बांगलादेश

(अमेरिकेचा मक्याचा दर ३, ३०० रुपये)

२,७०० - व्हिएतनाम

२,६०० - नेपाळ

स्थिती

  • जागतिक स्तरावर अमेरिका, चीन, ब्राझील, अर्जेंटिना, युक्रेन आणि भारतात उत्पादन

  • भारत मक्याच्या क्षेत्रात जगामध्ये चौथ्या, तर उत्पादनाबाबत सातव्या स्थानावर

  • जगातील एकूण क्षेत्राच्या ४ टक्के क्षेत्रावर, तर उत्पादनाच्या बाबतीत दोन टक्के उत्पादन भारतात

  • कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ, बिहार, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, तेलंगण, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन

  • रब्बीमधील महाराष्ट्रातील मक्याची पेरणी साडेतीन लाख हेक्टरच्या पुढे पोचली. ती गेल्यावर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी जास्त